पुणे, मुंबई, हैदराबादसह देशात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आणि इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक यासिन भटकळला बुधवारी रात्री बिहारमधील भारत आणि नेपाळच्या सीमेवरून अटक करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी सकाळी ही माहिती दिली. यासिनसोबत त्याचा साथीदार आणि कुख्यात दहशतवादी असादुल्ला अख्तर यालाही अटक करण्यात आली. यासिन आणि असादुल्ला या दोघांनाही गुरुवारी संध्याकाळी मोतिहारी येथील न्यायालयात कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत हजर करण्यात आले. न्यायालयाने या दोघांनाही तीन दिवसांची पोलिस कोठडी (ट्रान्झिट रिमांड) सुनावली आहे. या दोघांनाही राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) ताब्यात देण्यात आले असून, त्यांना दिल्लीला आणले जाण्याची शक्यता आहे.
कोण आहे यासिन भटकळ?
गेल्या पाच वर्षांपासून देशातील सुरक्षायंत्रणा आणि गुप्तचर संस्था यासिन भटकळचा शोध घेत होत्या. पुण्यात १३ फेब्रुवारी २०१० रोजी झालेला जर्मन बेकरी बॉम्बस्फोट यासिन भटकळनेच घडवून आणला होता. त्यासाठी यासिनवर दहा लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते. यावर्षी फेब्रुवारीमध्ये हैदराबादमधील दिलसुखनगरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात एक बॉम्ब स्वतः यासिन भटकळनेच ठेवला होता, असे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले होते. मुंबईत १३ जुलै २०११ रोजी झालेले तीन बॉम्बस्फोटही यासिन भटकळनेच घडवून आणले होते. तोच या स्फोटांचा सूत्रधार होता. वेगवेगळ्या स्फोटांच्या शोधात यासिन भटकळवर ७५ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते.
…यासाठी हवा होता यासिन भटकळ
विविध राज्यांतील दहशतवादविरोधी पथके आणि पोलिस यंत्रणा यासिन भटकळच्या मागावर होती. त्याचबरोबर गेल्या सहा महिन्यांपासून एनआयएकडूनही त्याचा शोध घेण्यात येत होता. काही दिवसांपूर्वीच लष्करे तैय्यबाचा दहशतवादी अब्दुल करीम टुंडा याला नेपाळच्या सीमेवरून अटक करण्यात आली होती. टुंडा हा कुख्यात दाऊद इब्राहिमचा अतिशय जवळचा समजला जातो. टुंडाच्या अटकेनंतर सुरक्षायंत्रणांना मिळालेले हे मोठे यश आहे.