पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा अल्पसंख्याकांना टार्गेट करण्यात आलं असून ११ कोळसा खाण कामगारांचं अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे. रविवारी बलुचिस्तान येथे ही हत्या करण्यात आली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेले सर्वजण शिया हाजरा समुदायाचे होते.

हे सर्व कामगार कामावर जात असताना सशस्त्र दहशतवाद्यांकडून त्यांचं अपहरण करण्यात आलं. यानंतर काही वेळातच गोळ्या घालून त्यांची हत्या करण्यात आली. सहा कामगारांचा घटनास्थळी तर इतर पाच जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. हत्या करण्याआधी कामगारांची परिसरात परेड काढण्याची आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिल्याचं पीटीआयने म्हटलं आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी घटनेचा निषेध केला असून हत्या करणाऱ्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच पीडितांच्या कुटुंबीयांना सरकार एकटं सोडणार नाही असं आश्वासन दिलं आहे.

बलुचिस्तान किंवा क्वेट्टा येथे शिया हाजरा संप्रदायाला टार्गेट करण्यात आल्याची ही पहिलाच घटना नाही. याआधी २०१९ मध्ये हाजरा हाऊसिंग सोसायटी येथे आत्मघाती बॉम्बहल्ल्यात २१ जणांचा मृत्यू झाला होता. आयसीस आणि लष्कर-ए-झांगवी यांनी या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.