News Flash

जम्मू काश्मीरमध्ये पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

रात्री उशिरा दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला.

जम्मू काश्मीर येथील हंदवारा येथील करालगुंड पोलीस ठाण्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. सुरक्षा रक्षक व दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरू असून परिसरात सर्च ऑपरेशनही केले जात आहे. रात्री उशिरा अंधाराचा फायदा घेऊन दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. यात कोणी जखमी किंवा मृत झाल्याचे अद्याप वृत्त नाही. दहशतवाद्यांच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

दरम्यान, जम्मू आणि काश्मीरमध्ये जवळपास २०० दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती केंद्र सरकारने बुधवारी राज्यसभेत दिली होती. या दहशतवाद्यांपैकी १०५ जणांनी यावर्षी सप्टेंबरपर्यंत घुसखोरी केली होती, अशी माहितीही देण्यात आली होती. यावर्षी सप्टेंबरपर्यंत १०५ दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून जम्मू-काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एकूण २०० दहशतवादी जम्मू आणि काश्मीरमध्ये सक्रिय आहेत, असे गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी सभागृहात सांगितले होते.

केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मदतीने सीमेपलिकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यात प्रामुख्याने सीमा व्यवस्थापन मजबूत करणे आणि आंतरराष्ट्रीय सीमा, नियंत्रण रेषेजवळ जवान तैनात करणे, सर्वाधिक घुसखोरी होणाऱ्या ठिकाणी चार पदरी भींती उभारणे आदींचा समावेश आहे, अशी माहितीही केंद्रीय गृहराज्यमंत्री अहिर यांनी दिली. नाल्यांवर पूल उभारण्यासारखे महत्त्वाचे पाऊलही उचलण्यात आले आहे. अत्याधुनिक यंत्रणा, शस्त्रे आणि सुरक्षा दलासाठी अत्याधुनिक उपकरणांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. घुसखोरी रोखण्यासाठी गुप्त यंत्रणेत सुधारणा करण्यात येत आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय सीमांवर फ्लड लाइट लावण्यात येत आहे, अशी अनेक महत्त्वाची पावले सरकारकडून उचलण्यात आली आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2016 10:48 pm

Web Title: terrorists attack a police station in karalgund handwara
Next Stories
1 नितीशकुमार भाजपच्या संपर्कात ?, भाजपच्या नेत्याची घेतली भेट
2 इराकमधील आत्मघाती बॉम्बस्फोटात ८० जणांचा मृत्यू
3 भारताच्या ५०० व २००० रूपयांच्या नव्या नोटांवर नेपाळमध्ये बंदी
Just Now!
X