भारतातील लोकशाही उलथवून टाकण्याच्या प्रयत्नात दहशतवाद्यांकडून काश्मिर खोऱ्यात उतावीळपणे हल्ले केले जात आहेत. मात्र, भारतीय जवान स्वत:च्या प्राणांची आहुती देऊन देशाच्या सीमेचे रक्षण करत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. ते शनिवारी झारखंडच्या हजारीबाग येथील निवडणूक प्रचाराच्या सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी मंगळवारी अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली.
मंगळवारी अतिरेक्यांनी काश्मीरच्या विविध भागांत हल्ले चढविले होते. यात लष्करातील एक लेफ्टनंट कर्नल व अन्य सात जवान तसेच तीन पोलीस शहीद झाले होते. लष्करानेही प्रत्युत्तर दिल्याने तब्बल सहा तास चाललेल्या या धुमश्चक्रीत सहा अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आणि मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात लष्कराला यश आले. पंजाब रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल संकल्प कुमार यांना वीरमरण आले.
जम्मू-काश्मीरमध्ये नऊ डिसेंबरला मतदानाचा तिसरा टप्पा पार पडणार आहे. मात्र निवडणुका शांततेत पार पडू न देण्यासाठी दहशतवादी सक्रिय झाल्याचे चित्र आहे. येत्या काही दिवसांत काश्मीरच्या खोऱ्यात दहापेक्षा जास्त दहशतवादी संघटना हल्ला करण्यासाठी दबा धरुन बसल्याची माहिती केंद्रीय गुप्तचर विभागानं जारी केली आहे.