दहशतवाद्यांना सागरी मार्गाने हल्ला करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती असून, याबाबत सावधगिरी बाळगावी लागेल, असे नौदल प्रमुख अॅरडमिरल सुनील लांबा यांनी म्हटले आहे. भारताला अस्थिर करू पाहणाऱ्या एका देशाच्या पाठबळाने दहशतवाद्यांनी पुलवामा हल्ला केला, असेही त्यांनी सांगितले.

नौदल प्रमुख अॅरडमिरल सुनील लांबा हे मंगळवारी भारत-पॅसिफिक प्रादेशिक संवाद कार्यक्रमात उपस्थित होते. अॅडमिरल लांबा म्हणाले, दहशतवादी संघटना किती वेगाने उभी राहते ते आम्ही पाहिले आहे. दहशतवाद ही आगामी काळातील जागतिक समस्या ठरु शकते. भारतातील सुरक्षा दल दहशतवादाला संपवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून आता जगभरातील देशांनी दहशतवाद रोखण्यासाठी आणि तो नष्ट करण्यासाठी एकत्र येऊन काम करावे. जगातील दहशतवादाने वेगळे स्वरूप धारण केले आहे, असे त्यांनी सांगितले.

भारताला अस्थिर करू पाहणाऱ्या एका देशाच्या पाठबळाने दहशतवाद्यांनी पुलवामा हल्ला केला. आता दहशतवाद्यांना सागरी मार्गाने हल्ला करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. मुंबईवर झालेला २६/११ चा हल्लाही सागरीमार्गाने आलेल्या दहशतवाद्यांनी केला होता, याकडे लांबा यांनी लक्ष वेधले.

भारताने सागरी सुरक्षेवर भर दिला असून सागरी सुरक्षेतील त्रुटी आता दूर करण्यात आल्या आहेत. सागरी हद्दीवर नजर ठेवण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. देशभरात एकूण ४२ रडार स्टेशन असून या सर्व स्टेशन्सना गुरुग्राम येथील मुख्यालयाशी जोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.