दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यातील तैनात सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला आहे. पुलवामा जिल्ह्यातील पंजगाम भागातील सीआरपीएफच्या तळावर दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबाराला भारतीय जवानांनीही सडेतोड उत्तर दिले. यामध्ये अद्याप कुठलीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

गोळीबारानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. या हल्ल्यानंतर शोध पथकाकडून आजूबाजूच्या परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे. दहशतवाद्यांनी नेमक्या अशावेळी हल्ला केला आहे. ज्यावेळी सीआरपीएफचे महासंचालक आर. आर. भट्टनागर हे काश्मीर दौऱ्यावर गेले आहेत.

दरम्यान, दहशतवाद्यांनी यापूर्वी श्रीनगरच्या करन नगर भागात सीआरपीएफच्या २३ बटालियनच्या तळावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता. यावेळी मुख्य प्रवेशद्वारावर तैनात जवानांनी दहशतवाद्यांचा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला होता. यानंतर दहशतवादी पळून जात एका इमारतीत घुसले होते. यानंतर दोन्ही बाजूंनी चकमक सुरु होती. या हल्ल्यावेळी जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. यावेळी एक जवानही शहीद झाला होता.