जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपार येथे आज(सोमवार) दुपारी दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी सोपोर येथील नगरपालिका कार्यालयावर हल्ला करत गोळीबार कोला. ज्यामध्ये ब्लॉक विकास परिषदेचे सदस्य आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण जखमी झाल्याीच माहिती समोर आली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सोपोर नगरपालिका कार्यालयाबाहेर बीडीसी सदस्य रियाज अहमद आणि त्यांचा सुरक्षा रक्षक शफात अहमद यांच्यावर गोळीबार केला. ज्यामध्ये या दोघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. तर अन्य सदस्य शमसुद्दीन पीर हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी परिसरास वेढा दिला असून, जवानांकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

या अगोदर जम्मू-काश्मीरमधील शोपियांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी धडाकेबाज कामगिरी करत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.  शोपियांच्या मनिहाल गावात चार दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आलं होतं.

हे दहशतवादी लश्कर ए तोयबा या संघटनेशी निगडीत होते व  ही संयुक्त मोहीम भारतीय सेनेच्या ३४ आरआर, पोलीस आणि सीआरपीएफने मिळून यशस्वी केली होती. या मोहीमेत जवानांनी एके-47 रायफलसह तीन पिस्तूलं देखील हस्तगत करण्यात आली होती.