पाकिस्तानमधील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष आणि पाकिस्तानी संसदेचे सदस्य बिलावल भुट्टो जरदारी यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारवर टिका केली आहे. भारतीय विमानांनी दहशवाद्यांवर बॉम्ब हल्ला करुन त्यांच्या खात्मा करु नये म्हणून सरकारने त्यांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने ताब्यात घेतले असल्याचे मत बिलावल यांनी नोंदवले आहे.

दहशतवादी गटांविरोधात कारवाई करण्यासंदर्भात पाकिस्तान सरकारचा उद्देश संशयास्पद असल्याचे बिलावल म्हणाले आहेत. ‘इम्रान खान यांच्या सरकारने दहशतवाद्यांना अटक केलेली नाही. उलट भारतीय विमानांनी बॉम्ब हल्ला करुन त्यांचा खात्मा करु नये म्हणून संरक्षणार्थ त्यांना सरकारने ताब्यात घेतले आहे,’ अशा शब्दांमध्ये बिलावल यांनी इम्रान सरकारला लक्ष्य केलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना बिलावल यांनी हे मत नोंदवले. राष्ट्रीय उत्तरदायित्व खात्याने (एनएबी) दोन तास बिलावल आणि त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान असिफ अली जरदारींची चौकशी करण्यात आली. भ्रष्टाचाराचे आरोप या पिता-पुत्रांवर लावण्यात आल्यानंतर ही चौकशी एनएबीने केली. त्याआधी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बिलावल यांनी इम्रान सरकारवर निशाणा साधला.

दहशतवादी संघटनांना वाचवण्याबरोबरच इम्रान खान याच दहशतवादी संघटनांचा वापर करुन घेत असल्याचा आरोपही बिलावल यांनी केला आहे. याआधीही बिलावल यांनी इम्रान सरकारवर निशाणा साधत पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांवर सरकारचा वचक नसून ते मुक्तपणे काम करत असल्यचा आरोप केला होता. दुसऱ्या देशांमध्ये दहशतवादी कारवाया करणारे दहशतवादी पाकिस्तानमध्ये मोकाट कसे फिरत आहेत असा सवाल बिलावल यांनी सत्ताधाऱ्यांना केला होता. किस्तानमधील सक्रिय दहशतवादी संघटनांवर कठोर कारवाई केली जात नाही. माझ्या आईचीही हत्या याच कारणामुळे झाली. हे दहशतवादी गट पाकिस्तानमध्ये लहान मुलांचे प्राण घेत आहेत. परदेशांमध्ये दहशतवादी कारवाया करत आहेत. आज संपूर्ण पाकिस्तानला दहशतवादाची किंमत मोजावी लागत असल्याचे बिलावल म्हणाले होते.

दरम्यान पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवादी संघटनांविरोधात कठोर भूमिका घ्यावी आणि भारतीय उपखंडातील तणाव वाढू नये याची दक्षता घ्यावी. भारतात आणखी एखादा दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी तंबीच अमेरिकेने गुरुवारी पाकिस्तानला दिली आहे. अमेरिकेतील व्हाइट हाऊसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने प्रामुख्याने जैश-ए- मोहम्मद आणि लष्कर- ए- तोयबा या दहशतवादी संघटनांवर कारवाई करावी, अशी अमेरिकेची भूमिका आहे. आता जर भारतात पुन्हा एखादा दहशतवादी हल्ला आणि यामागे पाकमधील दहशतवादी संघटनेचे हात असल्यास पाकला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे सूत्रांनी सांगितले.

“पाकिस्तानने गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी संघटनांविरोधात भूमिका घेतली आहे. मात्र, त्यांनी आणखी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. पाकने यापूर्वीही दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यांना नजरकैदेत ठेवले आणि काही महिन्यांनी त्यांची सुटका केली. काही नेत्यांना तर देशभरात फिरण्याची आणि जाहीर सभा घेण्याचीही मुभा आहे. त्यामुळे पाकिस्तानने आता ठोस आणि कठोर भूमिका घ्यावी”, असे व्हाइट हाऊसमधील सूत्रांनी स्पष्ट केले. पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादी संघटनांचे तळ आहेत. पाकिस्तानमधील आर्थिक स्थिती पाहता आणि एक जबाबदार देश म्हणून त्यांना जगात ओळखले जावे असे पाकला वाटत असेल तर त्यांनी आता या तळांवर कारवाई केलीच पाहिजे, असे अमेरिकेने पुन्हा एकदा सुनावले आहे.