शहरात सोमवारी सापडलेल्या स्फोटकांच्या मोठय़ा साठय़ावरून हे सिद्ध होत आहे की, दहशतवाद्यांना तब्बल १८ बॉम्ब तयार करायचे होते. शहरातील एका लॉजमध्ये सोमवारी नऊ टाइमबॉम्ब आणि अन्य दोन शक्तिशाली बॉम्ब सापडले. हे बॉम्ब निकामी करण्यात आले असले तरी दहशतवाद्यांची अनेक बॉम्बस्फोट घडवण्याची योजना होती, हे यावरून सिद्ध होत आहे.
पाटणा येथे भाजपच्या सभेत २७ ऑक्टोबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांशी या बॉम्बचे साधम्र्य असल्याने बॉम्बस्फोटांची योजना रांचीतच आखण्यात आली असावी, असा कयास आहे.
रांचीतील लॉजमध्ये नऊ बॉम्बशिवाय १९ डिटोनेटर आणि २५ जिलेटिनच्या काडय़ा सापडल्या आहेत. त्यामुळे आणखी नऊ बॉम्ब तयार करण्याची त्यांची योजना होती, हे दिसून येते. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसली, तरी एका दाम्पत्याची चौकशी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.