अमेरिकन उद्योग सम्राट इलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ या कंपनीनं ‘फाल्कन हेवी’ हे प्रचंड शक्तीशाली अवकाश यान अवकाशात सोडले. जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका खासगी कंपनीनं अंतराळ उड्डाण यशस्वी केले. या यानासोबत इलॉन मस्क यांनी आपली टेस्ला कारही अवकाशात पाठवली. ‘स्टारमन’ रुपातली बाहुलीदेखील लाल रंगाच्या कारसोबत अवकाशात पाठवण्यात आली. पण ही कार अवकाशात आपला मार्ग भरकटली आहे अशी माहिती काही इंग्रजीवृत्तपत्रांनी समोर आणली आहे.

इलॉन यांनी या कारचा शेवटचा फोटो ट्विटरवर शेअर केला. चेरी रंगातली इलॉन यांच्या टेस्ला कारचा रंग अवकाशात जाताच पूर्णपणे उडाला. इतकंच नाही तर तिच्यावर पोचे पडल्याचंही दिसून येत आहे. ‘डेली मेल’नं दिलेल्या माहितीनुसार मस्क यांनीदेखील टेस्ला कार ही अवकाशात भरकटली असल्याचं कबुल केलं आहे.  ‘फाल्कन हेवी’ या शक्तीशाली अवकाशयानातून निघाल्यानंतर टेस्ला कारनं पृथ्वी आणि मंगळाच्या कक्षेत जाणं अपेक्षित होतं पण ही कार आपला मार्ग भरकटली आहे. या कारला अवकाशात तिच्या निश्चित मार्गाकडे पाठवण्यासाठी इंधनाचा स्फोट ज्या तीव्रतेने व्हायला हवा होता, तो झाला नाही त्यामुळे ही कार मार्ग भरकटली असल्याचं इलॉन मस्क यांनी कबुल केलं आहे. त्याचप्रमाणे अवकाशात असलेल्या रिडिएशनच्या परिणामामुळे अवकाशात पाठवल्यानंतर काही तासांत या कारची अवस्था वाईट झाल्याचंही फोटोतून दिसत आहे. टेस्ला कारचा चकचकीत रंग अवकाशात फिका पडला असतून तिच्यावर ठिकठिकाणी पोचे पडल्याचंही दिसून येत आहे.

या कारमधील प्लॅस्टिक आणि कार्बन फायबर फ्रेमवर अवकाशातील बलाचा आणि रेडिएशनचा परिणाम होऊन या गाडीचं नुकसान होऊ शकतं अशी शक्यता काही संशोधकांनी वर्तवली असल्याचं डेली मेलनं म्हटलं आहे. कदाचित रेडिएशनमुळे येणाऱ्या काळात या कारचे तुकडे होतील अशी भीतीही काही संशोधकांनी वर्तवली आहे. भारतीय वेळेनुसार बुधवारी पहाटे  मस्क यांचं ‘फाल्कन हेवी’ हे यान अवकाशात झेपावलं. मंगळावर मानवी वस्ती करण्याच्या दृष्टीनं प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणून मस्क यांच्या मोहिमेकडे पाहिलं जातं.