नोटबंदीनंतर देशात निर्माण झालेला ‘अर्थ’कल्लोळ आणखी सुरूच असल्याचे दिसत आहे. मंगळवारीही बँका व एटीएमसमोर पैसे काढण्यासाठी मोठ्या रांगा लागलेल्या दिसून आल्या. नागरिक त्रस्त झाले आहेत. परंतु भाजपचे राष्ट्रीय महासचिव राम माधव यांनी नोटबंदीचा पुरस्कार करताना कठीण समयीच ‘देशभक्ती’ची कसोटी लागते असे म्हटले आहे. ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५०० आणि हजार रूपयांच्या नोटा रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर सामान्य लोकांना येत असलेल्या अडचणींमुळे सरकारवर मोठ्याप्रमाणात टीका होत आहे. राम माधव यांनी मंगळवारी यासंबंधी ट्विट केले. ‘कठीण समयीच देशभक्तीची कसोटी लागते. सध्या आपण अनेक ठिकाणी हे पाहत आहोत. अन्यथा इतरवेळी आरामखुर्चीवर बसून प्रत्येकजण देशभक्त बनलेला असतो’ असा टोला त्यांनी ट्विटरवर लगावला आहे. विशेष म्हणजे माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार नोटबंदीमुळे देशभरातून आतापर्यंत २४ हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
राम माधव यांच्यापूर्वी सोमवारी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे यांनी रेशन दुकानात रांगेत उभारलेल्यांचाही मृत्यू होतो असे म्हटले होते. सामान्य जनता आपल्याबरोबर आहे. आपल्याला बचावात्मक पवित्रा घेण्याची गरज नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भाजप खासदारांना संबोधित करताना म्हटले होते. तर जो पक्ष या निर्णयाला विरोध करत आहे तो दहशतवादाला मदत करत असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला होता.
केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे १० नोव्हेंबरपासून बँकांमधून जुन्या नोटा बदलून देणे आणि पैसे देण्याचे काम सुरू झाले आहे. परंतु काही ठिकाणी लवकर पैसे संपत आहेत. तसेच ११ नोव्हेंबरपासून देशातील अनेक एटीएममधून पैसे निघण्यास सुरूवात झाली आहे. परंतु तिथेही बँकांसारखीच स्थिती निर्माण झाली आहे. तिथेही काही वेळातच पैसे संपत आहेत. बँकांमधून लोकांना २ हजार रूपयांच्या नोटा दिल्या जात आहेत. या पैशांचे सुटे करणेही नागरिकांना कठीण जात आहे. चलनाची टंचाई ओळखून सरकारने रविवारी ५०० रूपयांच्या नव्या नोटा जारी करण्याची घोषणा केली आहे.