मध्यरात्र उलटून गेल्यावर अचानक दारावरील बेल वाजते आणि बाहेर गेल्यानंतर दारात कोणीच नसते. हा असा प्रकार अमेरिकेमधील टेक्सासमध्ये मागील काही दिवसांपासून घडत आहे. स्थानिकांनी यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली आहे. पोलिसांनी यासंदर्भात चौकशी करुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला.

मॉंटगोमेरी पोलीस स्थानकाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकामध्ये या प्रकाराची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. रात्रीच्या सुमारास केवळ पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट परिधान केलेली एक महिला लोकांच्या घराच्या बेल वाजवून निघून जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले आहे. या महिलेच्या पायामध्ये चप्पल नसून तिने हाताला मनगटाजवळ रिबिन्ससारखे कापड बांधलेले या व्हिडीओमध्ये दिसत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पोलिसांनी या व्हिडीओमधील काही स्क्रीनशॉर्ट आपल्या फेसबुक पेजवरून शेअर केले असून या महिलेबद्दल काहीही माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क करण्याची सुचना केली आहे.

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या या महिलेला मानसिक आजार असावा किंवा ती हरवली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात असल्याने पोलिसांनी या महिलेचा शोध सुरु केला आहे. अनेकांनी पोलिसांना या महिलेचे फोटो आणि व्हिडीओ पाठवले असून ही महिला हरवल्यासारखी वाटत असल्याचे सांगितले आहे.

मात्र या व्हिडीओतील महिलेला अद्याप पोलीस शोधू शकलेले नाही. तसेच पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या हरवलेल्या व्यक्तींपैकी कोणत्याही व्यक्तीशी या महिलेचा चेहरा जुळत नसल्याची माहिती समोर आली आहे.