करोनाचा कहर सुरू असलेल्या उत्तर प्रदेशात नवाच वाद निर्माण झाला आहे. थायलंडमधून आलेल्या एका महिला पर्यटकाचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या महिलेच्या मृत्यूचा मुद्दा उत्तर प्रदेशात चांगलाच तापला आहे. ही महिला कॉल गर्ल असून, भाजपाचे खासदार संजय सेठ यांच्या थायलंडवरून तिला बोलावलं होतं, असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रवक्ते आय.पी. सिंग यांनी केला आहे. खासदार संजय सेठ यांनी याला प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र, महिला नेमकी कोणत्या कारणासाठी आली होती, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

थायलंडमधील एक ४१ वर्षीय महिला भारतात पर्यटनासाठी आली होती. ही महिला लखनौमध्ये होती. तिला करोनाची लक्षणं दिसून आल्यानंतर लखनौतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. करोना वार्डामध्ये उपचार सुरू होते. दरम्यान, ३ मे रोजी या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला लखनौमध्ये नेमकी कशासाठी आली होती, हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. लखनौच्या पोलीस आयुक्तांनी चौकशीसाठी पोलीस उपायुक्त संजीव सुमन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, महिलेच्या मृत्यूनंतर पोलिसांनी महिलेशी परिचय असलेल्या टूर गाईड सलमान खान यांची चौकशी केली. त्याच्याकडे महिलेच्या भेटीमागील माहिती घेण्याचा प्रयत्न केला. लखनौ पोलिसांनी सलमान खानच्या उपस्थितीत महिलेवर अंत्यसंस्कार केले. त्याचबरोबर तिच्या कुटुंबीयांना अंत्यदर्शन घेता यावं, म्हणून अंत्यसंस्काराचं लाईव्ह करण्यात आलं होतं.

टूरिस्ट नव्हे कॉल गर्ल? राजकारण पेटलं…

महिलेच्या मृत्यूनंतर समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आय.पी. सिंग यांनी भाजपाचे खासदार संजय सेठ यांच्या मुलावर गंभीर आरोप केला आहे. जगभरात करोना महामारीचं संकट असताना थायलंडमधून कॉल गर्लला बोलावण्यात आलं. तिचा करोनामुळे मृत्यू झाला, असा आरोप सिंग यांनी केला असून, या प्रकरणात कारवाई करण्याचं आणि चौकशी करण्याचं उत्तर प्रदेश पोलिसांमध्ये धाडस आहे का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

आणखी वाचा- करोना रुग्णांच्या मृतदेहावरील कपडे चोरुन त्यावर ब्रॅण्डेड कंपन्यांचे लोगो लावून विकणारी टोळी अटकेत

सिंग यांनी लखनौ पोलिसांनाही काही सवाल केले आहेत. “लखनौ पोलिसांनी थायलंडमधून बोलवण्यात आलेल्या कॉल गर्लच्या मृत्यूवर आतापर्यंत अधिकृत निवेदन का जाहीर केलं नाही? त्या महिलेच्या मृतदेहाच शवविच्छेदन करण्यात आलं होतं का? हा शिवम कुक कोण आहे, ज्यांच्याकडे मृतदेह स्वाधीन कऱण्यात आला? त्याच्या जीवाला धोका आहे? स्थानिक हॅण्डलर राकेश शर्मा कुठे गायब झाला आहे? एजंट सलमान खान कुठे आहे? मला गुन्हा दाखल करण्याची धमकी देणाऱ्यांनी सावध व्हावं. उत्तर प्रदेश पोलीस मुलीच्या मृत्यूचा तपास करु शकते का? की सत्तेच्या दबावाखाली त्यावर पडदा टाकण्याचं काम करणार आहे? या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मी करतो. हा मृत्यू करोनामुळे झालाय की, त्यामागे काही षडयंत्र आहे?,” असा आरोप सिंग यांनी केला आहे.

सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर भाजपाचे खासदार संजय सेठ यांनी लखनौच्या पोलीस आयुक्तांना पत्र दिलं आहे. “मला व माझ्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी जे वृत्त पसरवलं जात आहे, ते निराधार असून, दिशाभूल करणारं आहे. या प्रकरणाशी माझ्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही. या प्रकरणात मी पोलीस आयुक्तांना सूचना केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे,” असं सांगत खासदार सेठ यांनी आरोप फेटाळून लावला आहे.

आणखी वाचा- करोनाबळींची संख्या अडीच लाखांच्या उंबरठ्यावर; २४ तासांत ३,७५४ मृत्यू

लखनौ पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. लखनौ पोलिसांकडून तशी माहिती देण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन केलं असून, पथकाने चौकशी सुरू केली असल्याचं लखनौ पोलिसांनी म्हटलं आहे. संबंधित लोकांची चौकशी केली जात असून, चौकशीतून समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असं लखनौ पोलिसांनी म्हटलं आहे.