थायलंडमधल्या गुहेतून सुटका झाल्यानंतर आठवडयाभरापासून रुग्णालयात उपचार घेत असलेली ती बारा मुले आणि त्यांचा प्रशिक्षक बुधवारी पहिल्यांदा सर्वांसमोर आले. यावेळी या सर्व मुलांनी उपस्थितांना हात उंचावून अभिवादन केले. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते तसेच थायलंडच्या परंपरेनुसार या मुलांनी हात जोडून नमस्कारही केला. १८ दिवस अंधाऱ्या गुहेत काढावे लागल्यामुळे या मुलांचे कुठे मानसिक खच्चीकरण झाले आहे किंवा ती शारीरीक दृष्टया कमजोर झाली आहेत असे वाटले नाही.

आम्ही गुहेतून बाहेर येणे एक चमत्कार आहे अशी प्रतिक्रिया अदुल सॅम या १४ वर्षीय मुलाने पत्रकार परिषदेत दिली. यंत्रणा आमच्यापर्यंत कधी पोहोचणार हे ठाऊक नव्हते. त्यामुळे त्यावर अवलंबून चालणार नव्हते. म्हणून आम्ही सुद्धा आमच्या परिने बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होतो असे या मुलासोबत असलेला त्यांचा प्रशिक्षक एक्कापोल चांटावाँग याने सांगितले.

पहिले नऊ दिवस यंत्रणा या मुलांपर्यंत पोहोचल्या नव्हत्या. त्यावेळी आम्ही खडकातून येणारे पाणी पिऊन दिवस काढले असे एका मुलाने सांगितले. २३ जूनपासून ही मुले गुहेमध्ये बेपत्ता झाली होती. नऊ दिवसांनी ३ जुलैला ब्रिटीश पाणबुडयांनी या मुलांना शोधून काढले. आज या मुलांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पत्रकार परिषदेत सर्वांसमोर आणण्यात आले. त्यावेळी डॉक्टर, नातेवाईक आणि मित्र परिवार उपस्थित होता.

या मुलांनी आपल्या संघाचे वाईल्ड बोअरचे टी-शर्ट घातले होते. ही सर्व मुले ११ ते १६ वयोगटातील असून २३ जूनला प्रशिक्षक एक्कापोल सोबत ही मुले उत्तर थायलंडमध्ये गुहा पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी बाहेर पावसाचा जोर वाढल्यामुळे ही मुले आतमध्येच अडकून पडली होती.

रुग्णालयाच्या व्हॅनमधून ही सर्व मुले पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आली. या मुलांचे अनुभव ऐकण्यासाठी त्यांचे फोटो काढण्यासाठी प्रसारमाध्यमांनी मोठी गर्दी केली होती. ही मुलं मनात नेमक्या काय जखमा घेऊन बाहेर आली आहेत हे आम्हाला ठाऊक नव्हते असे थायलंडचे न्यायमंत्री तावातचाय म्हणाले. त्यांच्या खासगी जीवनाचा आदर करण्याचा सल्ला त्यांनी प्रसारमाध्यमांना दिला. प्रसारमाध्यमांच्या सेसमिऱ्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो अशी भिती त्यांनी व्यक्त केली.