थायलंडमधल्या गुहेत अडकलेल्या मुलांना वाचवण्याची बचाव मोहिम मंगळवारी यशस्वी झाल्यानंतर आता या मुलांचा सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ रुग्णालयातील असून सध्या या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या मुलांचे शारीरीक आणि मानसिक आरोग्य उत्तम आहे असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.

व्हिडिओमध्ये ही मुले रुग्णालयातील बिछान्यावर झोपलेली दिसत असून त्यांच्या चेहऱ्याला मास्क लावलेला आहे. कॅमेऱ्यासमोर या मुलांनी थायलंडच्या परंपरेनुसार हातजोडून नमस्कार केला आणि विजयी मुद्रेच्या खूणा केल्या. १८ दिवस अंधाऱ्या गुहेत काढावे लागल्यामुळे या मुलांचे कुठे मानसिक खच्चीकरण झाले आहे किंवा ती शारीरीक दृष्टया कमजोर झाली आहेत असे वाटले नाही.

गुहेमध्ये पाणी असल्यामुळे या मुलांना बाहेर काढणे खूपच कठिण होते. पण विविध देशातून आलेल्या पथकांनी उत्कृष्ट समन्वय दाखवून ही बचाव मोहिम यशस्वी केली. रविवारपासून या मुलांना गुहेबाहेर काढण्यास सुरुवात झाली. दरदिवशी चार मुलांना बाहेर काढण्यात येत होते. मंगळवारी संध्याकाळी अखेरच्या पाच जणांना बाहेर काढण्यात आले. एकूण १२ मुले आणि एक प्रशिक्षक असे तेरा जण अडकले होते.

तज्ञ पाणबुडयांनी प्रत्यक्ष ऑपरेशन सुरु करण्याआधी बऱ्याचवेळा रंगीत तालीम केली त्यानंतर रविवारपासून मिशन सुरु झाले होते. २३ जूनपासून ही मुले गुहेमध्ये अडकून पडली होती. थायलंडच्या वाईल्ड बोअर्स फुटबॉल संघातील १२ मुले आणि त्यांचा प्रशिक्षक चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहा पाहण्यासाठी गेले होते. ही मुले आतमध्ये असताना अचानक बाहेर पावसाचा जोर वाढला आणि गुहेबाहेर येण्याचा मार्ग बंद झाला होता. अखेर १८ दिवसांनी या मुलांची सुटका झाली.

थायलंड शोधकार्यात किर्लोस्कर समूहाच्या अभियंत्यांचे योगदान
सगळया जगाचे लक्ष लागलेल्या थायलंडमधील शोधकार्यात किलरेस्कर समूहाच्या दोन अभियंत्यांनी मोलाचे योगदान दिल्याचे पुढे आले आहे. थायलंडमधील या गुहेत अडकलेल्या फूटबॉल खेळाडूंची सुटका करताना वापरल्या गेलेल्या उपसा पंप तंत्रज्ञानातील निष्णात अभियंते म्हणून किर्लोस्कर कंपनीत कार्यरत असलेल्या सांगलीतील प्रसाद कुलकर्णी आणि त्यांच्या सोबत पुण्यातील अन्य एक अभियंते यांना येथे पाचारण केले होते. मदतकार्य करणाऱ्या बचाव पथकात ते सहभागी झाले होते.

या मदतकार्यात गुहेत खोलवर साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी पाण्यात राहून कार्यरत राहणाऱ्या शक्तिशाली उपसा पंपाची गरज होती. तसेच हे पंप विनाअडथळा सातत्याने सुरू ठेवणे हे देखील या मदतकार्यातील एक आव्हान होते. भारतातील किलरेस्कर उद्योग समूहाच्या सांगलीतील (किलरेस्करवाडी) ‘किलरेस्कर ब्रदर्स’ या कंपनीकडे या विषयातील तज्ज्ञता आणि अनुभव गाठीशी असल्याने त्यांनी याबाबत मदतीचा हात देऊ केला. या मदतीला थायलंड सरकारनेही लगेच प्रतिसाद दिल्यावर किलरेस्कर कंपनीच्या वतीने शुक्रवारीच कुलकर्णी यांच्यासह दोन अभियंत्यांना थायलंडला पाठवण्यात आले.