देशभरात मार्शल लॉ लागू केल्यानंतर बुधवारी दुसऱ्याच दिवशी थायलंडच्या लष्कराने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती़  थायलंडचे युक्रेन किंवा इजिप्त होऊ नये, यासाठी शासकीय आणि शासनविरोधी गटांनी समोरासमोर चर्चा करावी आणि देशातील सध्याच्या परिस्थितीवर तोडगा काढावा, यासाठी लष्कराने हा प्रयत्न केला होता़  
या वेळी अध्यक्षस्थानी असलेले लष्करप्रमुख प्रयुत चान-ओ-चा यांनी मध्यस्थाची भूमिका घेत आणीबाणीच्या परिस्थितीचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला़  विशेष म्हणजे बैठकीच्या वेळी सैन्याची उपस्थिती मंगळवारपेक्षा कमी दिसत होती़  या बैठकीला सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते, तसेच निवडणूक आयोगाचे सदस्य आणि सिनेटचे सदस्यही उपस्थित होत़े  शासनाच्या बाजूने आणि विरोधात निदर्शने करणाऱ्या आंदोलकांचीही उपस्थिती लक्षणीय होती़  एकूण ४० जणांनी बैठकीला उपस्थिती लावली होती; परंतु थायलंडचे काळजीवाहू पंतप्रधान निवात्तुम्रोंग बुंसोंगपैसान यांची अनुपस्थिती मात्र लक्षात येणारी ठरली़  
परंतु, तब्बल दोन तास चाललेली ही बैठक कोणत्याही तोडग्याविना आटोपण्यात आली़  त्यामुळे गुरुवारी याच विषयावर पुन्हा नव्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आह़े