दिल्ली सामूहिक बलात्कारच्या विरोधात निदर्शने करताना कॉन्स्टेबल सुभाष तोमर याच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी आठ जणांवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला होता त्यांना दिल्ली पोलिसांनी मंगळवारी क्लीन चिट दिली. या आठ जणांविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे दिल्ली पोलिसांनी मंगळवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केले.
तथापि, या आठ जणांनी निदर्शनाच्या वेळी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचे पुरावे असून ते आरोप कायम ठेवावेत, असे पोलिसांनी सांगितले. हे आठ युवक हे पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूप्रकरणात सहभागी नसल्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सिद्धार्थ लुथ्रा यांनी न्या. जी. पी. मित्तल यांच्या न्यायालयात स्पष्ट केले.
कैलास आणि अमित जोशी, शंतनुकुमार, नफीस, शंकर बिश्त, नंदकुमार, अभिषेक आणि चमनकुमार अशी या आठ जणांची नावे असून शंतनुकुमार हा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचा सदस्य आहे.