खासदारांना व्हीआयपी संस्कृतीपासून लांब राहण्याचा सल्ला देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवार माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा दाखला दिला. साधेपणा हीच पर्रिकर यांची ओळख होती, असा उल्लेख मोदींनी केला आणि सभागृहात पुन्हा एकदा सर्वांना पर्रिकरांची आठवण झाली.

दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली. यानंतर मोदींनी खासदारांना संबोधित केले. मोदी यांनी खासदारांना व्हीआयपी संस्कृतीपासून लांब राहण्याचा सल्ला दिला. देशातील लोकांना व्हीआयपी संस्कृतीचा राग आहे. आपणही नागरिक आहोत, मग आपण रांगेत उभे राहू शकत नाही का ?, असा सवाल मोदींनी विचारला. तुम्ही विमानतळावर जाता, खासदार असल्याने तुमची कोणी तपासणी केली तुम्हाला राग येतो. पण यात गैरकाय असेही मोदी म्हणालेत.

आपल्याला जनतेला पाहून बदलायला हवं. लालदिवा हटवल्याने आर्थिक फायदा झाला नाही. पण जनतेत एक चांगला संदेश गेला, असे मोदींनी सांगितले. आपल्याला एक ठराविक वर्ग निवडून आणत नाही. ना मोदींमुळे आपण जिंकतो. देशातील जनताच आपल्याला निवडून देते. आपण जे काही आहोत ते मोदींमुळे नाही तर या देशाच्या जनतेमुळे आहोत.