दीड वर्षाचा एक चिमुरडा खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडला. ७० फूट खोल अडकून बसला होता त्याची अखेर आता ४८ तासांनी सुटका करण्यात आली आहे. हा चिमुरडा बोअरवेलमध्ये पडल्यापासूनच त्याच्या सुटकेसाठी अथक प्रयत्न सुरु होते अखेर त्याची सुटका करण्यात यश आलं आहे. हरयाणातील हिसार या ठिकाणी असलेल्या बलसामंद गावात ही घटना घडली आहे. लष्कराने बोअरवेलमधून या चिमुरड्याची सुटका केली.

बुधवारी संध्याकाळी हा दीड वर्षांचा हा मुलाग बलासामंद या गावात असलेल्या बोअरवेलमध्ये पडला. त्यानंतर तातडीने त्याच्या बचावासाठी मोहीम राबवण्यात आली. हिसार येथील पोलीस उपायुक्त अशोक कुमार यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या घटनेची माहिती दिली. हा मुलगा खेळता खेळता ७० फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. त्यानंतर आम्ही एनडीआरएफच्या पथकाला या ठिकाणी पाचारण केलं त्यांनी बुधवारपासूनच या मुलाच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले होते.

नदीम असे या दीड वर्षाच्या मुलाचे नाव आहे. तिथे काम करणाऱ्या एका मजुराचा तो मुलगा आहे. त्याच्या पाच भावंडापैकी तो सर्वात लहान मुलगा आहे. जिथे काम सुरु आहे तिथे जवळच असलेल्या शेतात हे कुटुंब रहाते. त्याचे आई वडील काही कामानिमित्त बाहेर गेले होते. त्याचवेळी नदीम हा ७० फूट उघड्या बोअरवेलमध्ये पडला. नदीम पडल्याची माहिती मिळताच तातडीने त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु करण्यात आले होते. आज अखेर त्याची सुटका करण्यात आली. तब्बल ४८ तासांनी दीड वर्षांच्या नदीमला सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.