प्रतिष्ठित नोबेल पुरस्कारांची आजपासून घोषणा करण्यात येत आहे. सोमवारी मेडिसीनमधील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदा हा पुरस्कार अमेरिकेचे वैज्ञानिक जेम्स पी. एलिसन आणि जपानचे वैज्ञानिक तासुकू होंजो यांना संयुक्तरित्या जाहीर झाला आहे. या दोघांना हा पुरस्कार कर्करोगावरील उपचारांच्या शोधासाठी देण्यात येणार आहे. या दोघांनी कर्करोगावर उपचारांसाठी अशी थेरपी शोधून काढली ज्याद्वारे कर्करोगाच्या ट्यूमरशी लढण्याची शरीरातील पेशींची प्रतिकार शक्ती वाढवता येऊ शकते.

आजपासून आठवडाभर विविध क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा होणार आहे. आजच्या पहिल्या दिवशी फिजीओलॉजी किंवा मेडिसीन या क्षेत्रातील पुरस्कारांची घोषणा झाली. यंदा साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही, असा निर्णय नोबेलच्या अकादमीने घेतला आहे. गेल्या ७० वर्षांत असे पहिल्यांदाच घडत आहे की साहित्यातील नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही.

पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, स्वीडनमध्ये सांस्कृतीक घडामोडींचा मोठा चेहरा मानले गेलेले फ्रान्सचे नागरिक ज्यां-क्लाउड अर्नोल्ट हे लैंगिक आणि आर्थिक घोटाळ्यांतील आरोपांमध्ये अडकले आहेत. यामुळे नोबेल अकादमीच्या प्रतिमेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे यंदा अकादमीने साहित्यातील नोबेल पुरस्कार न देण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र, साहित्यातील नोबेल यंदा दिला जाणार नसला तरी शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळतो याकडे लोकांच्या लक्ष्य असणार आहे. या पुरस्काराची घोषणा शुक्रवारी ओस्लोमध्ये केली जाणार आहे.