हेरगिरीच्या आरोपावरून गेल्या २५ वर्षांपासून पाकिस्तानातील कारागृहात खितपत पडलेल्या एका ५० वर्षीय भारतीय नागरिकाचा गूढरित्या मृत्यू झाल्याप्रकरणी केंद्र सरकारने पाकिस्तानातील प्रभारी उच्चायुक्तांना पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयासोबत बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर या गूढ मृत्यूचे कारणही शोधण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
पाकिस्तानातील कारागृहात मृत पावलेल्या भारतीय नागरिकाचे नाव कृपालसिंग असे असून १९९२ मध्ये त्यांनी वाघा सीमा ओलांडली असता त्यांना पकडण्यात आले. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बॉम्बस्फोट मालिकेप्रकरणी त्यांना फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली होती. कारागृहातील आपल्या कक्षात सोमवारी सकाळी कृपालसिंग मृतावस्थेत आढळले होते.