पंजाब नॅशनल बँकेला ११,३०० कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याने ईडीला पत्र लिहून आपल्या कंपनीतील महिला कर्मचाऱ्यावर सीबीआयने केलेली अटकेची कारवाई बेकायदा असल्याचे त्याने म्हटले आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यांत मोदीला कोर्टाने बजावलेल्या समन्सला उत्तर देताना त्याने ईडीला दोन पत्र लिहीले आहेत. यामध्ये त्याने आपल्या कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या सीबीआयच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. नीरव मोदीविरोधात शनिवारी विशेष न्यायालयाने अजामिनपात्र अटक वॉरंट जारी केले होते.

‘माझ्या कंपनीतील महिला अधिकारी कविता माणिककर यांना सीबीआयने बेकायदा पद्धतीने अटक केली. यामुळे कायद्याचा भंग झाल्याचे त्याने म्हटले आहे. ईडीच्या सहाय्यक संचालक अर्चना सालये यांना मोदीने २६ फेब्रुवारी रोजी पत्र लिहीले आहे.

दरम्यान, माणकिकर यांच्या वकिलांनी म्हटले आहे की, त्यांना सीबीआयने रात्री ८ वाजता अटक केली. कायद्यातील तरतुदीनुसार, सूर्य मावळल्यानंतर महिलेला अटक करता येत नाही. नीरव मोदीने ईडीला दोन पत्रे लिहीली होती. त्यापैकी एक २२ फेब्रुवारी तर दुसरे चार दिवसांनंतर लिहीले होते.