देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल असून, करोनाबाधितांची वाढती संख्या थांबत नसल्याचे चित्र आहे. मागील तीन दिवसांपासून सातत्याने चार लाखांहून अधिक नवीन करोनाबाधित आढळून येताना दिसत आहे. भारताच्या या करोनाविरोधातील लढाईत मदतीसाठी जगभरातील अनेक देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे. याचबरोबर देशातील अनेक कंपन्या व उद्योग समूह देखील पुढाकार घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर अदानी ग्रुपने देखील मदतीसाठी पुढाकार घेतला असून, महामारीला रोखण्यासाठी आपली सगळी यंत्रणा कामाला लावली आहे. ज्यामध्ये या समुहातील कर्मचारी व लॉजिस्टिक्सपासून बंदर व विमानतळांचा देखील समावेश आहे.

अदानी ग्रुपकडून माहिती देण्यात आली आहे की, त्यांनी मेडिकल ऑक्सिजन आणि वाहतुकीसाठी योग्य अशा क्रायोजेनिक कंटेनरबरोबरच आरोग्य विषयक पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी देखील योगदान दिलं आहे.तर, ग्रुपच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे की, अदानी समुहाने ७८० टन लिक्विड ऑक्सिजनची वाहतूक करण्यास सक्षम असलेल्या ४८ क्रायोजेनिक टँकची खरेदी केली आहे.

तसेच, जशी कोविडची दुसरी लाट भारतात आली, अदानी ग्रुपने आपल्या परदेशातील संपर्काचा लाभ घेणं सुरू केलं. जेणेकरून मेडिकल ऑक्सिजन आणि वाहतुकीस योग्य क्रायोजेनिक कंटेनर सारख्या महत्वपूर्ण व आवश्यक वस्तुंचा पुरवठा सुनिश्चित केला जाऊ शकेल.

आयात क्रायोजेनिक टँकरचे सरकारकडून राज्यांना वाटप

समुहाने सौदी अरब, थायलंड, सिंगापूर, ताइवान आणि यूएई सारख्या देशांमध्ये प्रमुख निर्मात्यांकडून ४८ क्रायोजेनिक टँक खरेदी केले आहेत. यातील काही मोठ्या क्रायोजेनिक टँकना गुजरातमधील मुंद्रा बंदराच्या माध्यमातून पाठवले गेले, तर उर्वरीत भारतीय वायु दलाच्या मदतीने देशात आणले गेले आहेत.