कृषी विधेयकावरुन काँग्रेसने जे काही आंदोलन केलं ती काँग्रेसची लबाडी आहे असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेले निर्णय महत्त्वाचे आहेत. जी दोन विधेयकं पास करण्यात आली ती क्रांतीकारी आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात याच दोन विधेयकांबाबत आश्वासन दिलं होतं. एवढंच नाही तर २०१७ मध्ये पंजाब विधानसभेच्या निवडणुका होत्या तेव्हाही त्यांच्याही जाहीरनाम्यात याच विधेयकांचा उल्लेख होता. काँग्रेसने जे वचन दिलं होतं ते मोदी सरकारने पूर्ण केलं. त्यामुळेच काँग्रेस बेगडी विरोध करतं आहे असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या पत्रकार परिषदेत केला.

शिवसेना कन्फ्युज पक्ष

शिवसेना कन्फ्युज पक्ष आहे अशीही टीका देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. शिवसेनेने शेतकऱ्यांबाबत काहीही योग्य भूमिका घेतलेली नाही. शिवसेनेने लोकसभेत पाठिंबा दिलाय आणि राज्यसभेत विरोध केला आहे. त्यामुळे त्यांची एक थेट भूमिकाच नाही. भाजपाच्या या निर्णयांना विरोध करणं यामागे निव्वळ राजकारण आहे. संजय राऊत यांनी जो प्रश्न विचारला तो मी त्यांनाच पुन्हा विचारु शकतो की महाराष्ट्रात तुमचं सरकार आहे तर महाराष्ट्रातला एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही याची गॅरंटी संजय राऊत घेतील का?

शेतकऱ्यांचा या विधेयकांना विरोधच नाही. काही नेते आपली दुकानदारी चालवण्यासाठी या विधेयकांना विरोध करत आहेत. दुकानदारी हा नागपुरी शब्द आहे त्याचा भलता अर्थ काढू नका असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. काही शेतकरी या विधेयकांना विरोध दर्शवत आहेत. मात्र त्यांची दिशाभूल केली जाते आहे. त्यांना काही कारण नसताना भडकवलं जातं आहे. ज्या शेतकऱ्यांना ही विधेयकं विरोधी वाटत आहेत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला खात्री आहे त्या शेतकऱ्यांचा विरोधही मावळेल अशी आम्हाला खात्री आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.