राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी विधेयकाना विरोध व आठ खासदरांच्या निलंबनामुळे सुरू झालेला राजकीय गोंधळ अद्यापही थांबलेला नाही. निलंबीत झालेल्या आठ खासदारांनी या कारवाईच्या निषेधार्थ संसद परिसरात धरणे आंदोलन सुरू केले आहे. या सर्व आठ खासदरांनी काल रात्रभर जागरण करून आपले आंदोलन सुरूच ठेवले. हे आंदोलन थांबवणार नसल्याचे या खासदरांकडून सांगण्यात आले आहे.

आंदोलन सुरू झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, जेडीएसचे देवेगौडा, समाजवादी पक्षाच्या जया बच्चन, काँग्रेसचे नेते अहमद पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह विरोधी पक्षनेते यांनी देखील आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थिती लावत आंदोलकांना पाठिंबा दिला.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह हे तर जवळपास चार तास आंदोलक खासदारांबरोबर बसून होते. यातील एका खासदाराने सांगितले की, त्यांनी देशभक्तीची गाणी गायली, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत फलक दर्शवले.

यातील काँग्रेसचे रिपुन बोरा व सीपीआयएमचे ए करीम यांचे वय ६५ च्याही पुढे असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न होता. मात्र आमच्याकडे पुरसे पाणी ठेवले होते व त्या दृष्टीने वेळोवेळी काळजी घेतली असल्याचे टीएमसीचे डेरेक ओ ब्रायन यांनी सांगितले.

आणखी वाचा- …म्हणून आम्ही शेतकरी आत्महत्येची आकडेवारी देण्यास असमर्थ; मोदी सरकारचे उत्तर

आमच्या शरीरातील साखरेची पातळी कमी होऊ नये म्हणून वेळोवेळी मध्यंतराच्या काळात आम्ही काळजी घेत होतो. हे अतिशय चांगले टीम वर्क आहे आणि आम्ही हे थांबवणार नाही. असे एका खासदाराने सांगितले. जर आंदोलकांची अचानक प्रकृती खराब झाली तर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका देखील त्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेली आहे.

आणखी वाचा- “संसदेत गुंडागर्दी करणाऱ्यांचं सदस्यत्व रद्द करण्यासाठी नवीन कायदा करा”

सध्या संसदेचे सत्र सुरू आहे तोपर्यंत हे आंदोलक खासदार राज्यसभेतील स्वच्छतागृहांचा वापर करू शकतात. मात्र, त्यानंतर त्यांना रिसेप्शनच्या ठिकाणच्या स्वच्छतागृहांचा वापर करावा लागेल, अशी माहिती एका खासदाराने दिली. आंदोलक खासदारांनी त्यांच्यासोबत केवळ त्यांचं अंथरूण, पांघरूण व उशाच आणल्या नाहीत, तर डासांपासून बचाव करण्यासाठी देखील काळजी घेतली आहे.