काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकातील काँग्रेसचे नेते डी.के शिवकुमार यांच्या अटकेला बदला घेण्यासाठी केलेले राजकारण म्हटले आहे. याबाबत राहुल गांधींनी ट्विट करत म्हटले आहे की, डी.के शिवकुमार यांची अटक बदला घेण्यासाठी केलेल्या राजकारणाचे उदाहरण आहे.

राहुल गांधींनी हे देखील सांगितले की, सरकार विरोधकांना जाणूनबुजून लक्ष्य करत आहे. तर, विरोधकांना त्रास देण्यासाठी ईडी आणि सीबीआयचा वापर केला जात असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे.

काँग्रेसच्या अन्य दिग्गज नेत्यांनी देखील डी.के शिवकुमार यांच्या अटकेचा निषेध केला आहे. तर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी देखील केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा दुरूपयोग केला जात असल्याचा आरोप केला आहे. याचबरोबर त्यांच्या अटकेच्या कारवाईस राजकीय विरोधातून करण्यात आलेले कृत्य म्हटले आहे.

‘‘माझ्या विरोधातील प्राप्तिकर आणि ईडीच्या तक्रारी या खोटय़ा आहेत आणि भाजपच्या द्वेषमूलक राजकारणातून त्या जन्मल्या आहेत. माझा ईश्वरावर आणि देशातील न्याययंत्रणेवर पूर्ण विश्वास असून या प्रकरणातून कायदेशीर आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर माझी प्रतिमा उजळून निघणार आहे.’’ अशी प्रतिक्रिया शिवकुमार यांनी दिली आहे.

आर्थिक गैरव्यवहारावरुन कर्नाटकतले काँग्रेसचे संकटमोचक नेते डी. के. शिवकुमार यांना अंमलबजावणी संचलनालयाने मंगळवारी अटक केली आहे. माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्यापाठोपाठ केंद्रीय तपास यंत्रणानी अटक केलेले हे दुसरे काँग्रेस नेते ठरले आहेत.