आसाम सरकारने राज्यातील सर्व सरकारी मदरसे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबरपासून सर्व मदरसे बंद होतील अशी माहिती आसामचे आरोग्य आणि शिक्षणमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी दिली आहे. सरकारी पैशांवर ‘कुराण’चं शिक्षण दिलं जाऊ शकत नाही असं माझं मत आहे, तसं असेल तर मग आपण बायबल आणि गीताही शिकवली पाहिजे असं त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे. “आम्हाला समानता आणायची असल्याने तसंच ही प्रथा थांबवायची असल्यानेच हा निर्णय घेण्यात आला,” असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

“नोव्हेंबरपासून आसाममधील सर्व सरकारी मदरसा बंद केले जातील. सरकार लवकरच यासंबंधी परिपत्रक प्रसिद्ध करणार आहे,” अशी माहिती हेमंत बिस्व सरमा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “सर्व सरकारी मदरसांचं रुपांतर नियमित शाळांमध्ये केलं जाईल. काही प्रकरणांमध्ये शिक्षकांची सरकारी शाळेत बदली केली जाईल”.

हेमंत बिस्व सरमा यांनी यावेळी मुस्लिम तरुणांनाकडून हिंदू तरुणींची होणारी फसवणूक यावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, “अनेक मुस्लिम मुलं हिंदू नावाने फेसबुकला फोटो पोस्ट करतात. फेसबुकवर मंदिरामधले आपले फोटो शेअर करतात. एकदा लग्न झालं की मुलीला तरुण आपल्या धर्मातील नसल्याचं लक्षात येतं. हे रितसर करण्यात आलेलं लग्न नसून विश्वासभंग आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.

पुढे त्यांनी सांगितलं की, “राज्य सरकारने याप्रकरणी कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पुढील पाच वर्षात स्वइच्छेने लग्न होतील आणि कोणाचाही फसवणूक होणार नाही याती काळजी राज्य सरकार घेणार आहे. फसवणूक करुन झालेल्या लग्नाविरोधात आम्ही लढा देत राहू”.