देशातील आतापर्यंतच्या सर्वांत मोठ्या बँकिंग घोटाळ्यातील संशयित आरोपी नीरव मोदीच्या वकिलाने बँकेवरच खापर फोडले आहे. बँकेच्या व्यावसायिक व्यवहारांनाच आता घोटाळ्याचे नाव दिले जात असल्याचा आरोप नीरव मोदीचे वकील विजय अग्रवाल यांनी केला आहे. माध्यमांत घोटाळ्याची जी रक्कम सांगितली जात आहे, त्यावरही त्यांनी शंका उपस्थित केली. संपूर्ण प्रकरण बँकेला माहीत होते. बँकेने कोटयवधी रूपयांचे कमिशन यासाठी घेतले.. पण ते आता मान्य करणार नाहीत. बँकेचा हा व्यावसायिक व्यवहार होता, आता त्याला घोटाळा म्हटले जात आहे. बँकेला अनेक वर्षांपासून त्यांचा वाटा दिला जात होता, असे अग्रवाल यांनी सांगितले. तसेच नीरव मोदीने देश सोडून पळ काढलेला नाही. आपली ५ हजार कोटींची संपत्ती देशात सोडून ते पळून का जातील असा सवाल करत, नीरव हे जागतिक व्यापारी आहेत. जेव्हा हे प्रकरण बाहेर आले, तेव्हा ते व्यवसायानिमित्त परदेशात होते. आता त्यांचा पासपोर्टही रद्द करण्यात आला आहे. त्यांच्या कुटुंबीयांपैकी अनेकांनी विदेशी नागरिकत्व घेतलेले आहे. त्यामुळे ते विदेशातच असतात, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

घोटाळ्यातील रकमेबाबत विजय अग्रवाल म्हणाले की, सीबीआयने स्वत: ही रक्कम २८०० कोटी रूपये असल्याचे म्हटले असून ती ५ हजार कोटींपर्यंत जाऊ शकते. मला माहीत नाही माध्यमांनी ११५०० कोटींचा आकडा कुठून आणला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, सीबीआयने बुधवारी फायरस्टार इंटरनॅशनलचा अध्यक्ष विपुल अंबानी, अधिकृत स्वाक्षरीकर्त्या कविता माणकिकर, वरिष्ठ अधिकारी अर्जुन पाटील, नक्षत्र ग्रुपचा सीएफओ कपिल खंडेलवाल आणि गीतांजलीचा व्यवस्थापक नीतेन सेठी यांना अटक केली.