जम्मू आणि लडाखमधील भेदभावाचा आरोप चुकीचा असून पीडीपी-भाजपाच्या सरकारमध्ये प्रत्येक निर्णयात भाजपादेखील आमच्यासोबत होती, अशा शब्दांत पीडीपीच्या अध्यक्षा आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्या आरोपांना उत्तर दिले आहे.

मुफ्ती म्हणाल्या, जम्मू आणि लडाखमधील भेदभावाचा आरोप चुकीचा असून काश्मीर खोऱ्यात सर्वाधिक लक्ष देणे आवश्यक होते. जर येथे भेदभाव होत होता तर पहिल्यांदा केंद्र आणि राज्यासमोर हा मुद्दा का मांडण्यात आला नाही. उलट सरकारच्या सर्व निर्णयांमध्ये भाजपाचे समर्थन होते. दरम्यान, जम्मू आणि लडाखमध्ये भेदभाव केला जात असून काश्मीरी नागरिकांना दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केली नाहीत, असा आरोप अमित शाह यांनी मुफ्ती सरकारवर केला होता.

त्यानंतर रविवारी शाह यांच्या आरोपांना मेहबुबा मुफ्ती यांनी ट्वीटद्वारे उत्तर दिले. एकामागून एक केलेल्या ट्वीटद्वारे त्यांनी म्हटले की, आमच्या माजी सहकारी पक्षाने आमच्यावर चुकीचे आरोप केले आहेत. आम्ही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून तयार करण्यात आलेल्या अजेंडा ऑफ अलायंस प्रती आपली प्रतिबद्धता कधीही तुटू दिली नाही. मात्र, असे असतानाही त्यांनी आपली जबाबदारी झटकून टाकत उलट आमच्यावरच आरोप केले आहेत.

हुर्रियतशी चर्चेसाठी भाजपाचे समर्थन होते

मेहबूबा एका ट्वीटमधून म्हणाल्या, कलम ३७० वरुन पाकिस्तान आणि हुर्रियतशी चर्चा करणे हा अजेंडा ऑफ अलायंसचा भाग होता. चर्चेला प्रोत्साहन देणे, दगडफेक करणाऱ्यांविरोधातील खटले मागे घेणे तसेच एकतर्फी शस्त्रसंधीचा भरवसा देणे या उपायांसाठी भाजपाचे पूर्णतः समर्थन होते.

काश्मीर खोऱ्यात विशेष लक्ष देणे आवश्यक होते

जम्मू आणि लडाखसोबत भेदभाव होत असल्याचे आरोप चुकीचे आहेत. बऱ्याच काळापासून काश्मीर खोऱ्यातील स्थिती बिघडत होती. त्यानंतर २०१४च्या पुरानंतर येथील परिस्थिती आणखीनच बिघडली. त्यामुळे विकासाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे होते. मात्र, ही सर्व परिस्थिती लक्षात घेता राज्यातील इतर भागाच्या विकासाकडे सरकारने कधीही दुर्लक्ष केले नाही.

भाजपाने आपल्या मंत्र्यांच्या कामगिरीची समिक्षा करावी

आपल्या मंत्रीमंडळातील भाजपाच्या मंत्र्यांवरही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, जमीनीवर कोणी किती विकासाची कामे केली हे लगेच दिसून येते. त्यामुळे भाजपाला विकासाच्या गोष्टी पहायच्या असतीलच तर त्यांनी त्यांच्या मंत्र्यांच्या कामगिरीची समिक्षा करावी. ज्यांनी मोठ्या प्रमाणावर जम्मू भागाचे नेतृत्व केले. मात्र, भेदभाव होतच होता तर या भाजपाच्या मंत्र्यांनी कधीही केंद्र किंवा राज्यासमोर ही बाब का मांडली नाही.

दरम्यान, आपल्या सरकारमध्ये वनमंत्री राहिलेले भाजपाचे नेते लाल सिंह यांनी पत्रकार शुजात बुखारी यांच्या हत्याप्रकरणावरुन दिलेल्या धमकीवजा विधानावरुन मुफ्ती यांनी भाजपाला सवाल केला आहे. त्या म्हणाल्या, काश्मीर खोऱ्यातील पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरुन लाल सिंह यांनी धमकीची भाषा केली आहे. भाजपा आता त्यांच्यावर कारवाई करणार का? असा सवाल त्यांनी भाजपा नेतृत्वाला विचारला आहे.