News Flash

“भारतीयांचं धर्माच्या आधारे विभाजन हाच CAA मागचा मोदी सरकारचा हेतू”

सोनिया गांधी यांचं मोदी सरकारवर तिखट शब्दांमध्ये टीकास्त्र

सुधारित नागरिकत्व कायदा (CAA) लागू करण्यामागे भारतीय नागरिकांचं धर्माच्या आधारे विभाजन करणं हाच मोदी सरकारचा हेतू आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. काँग्रेस कार्यकारिणीची बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीनंतर सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर तिखट शब्दांमध्ये टीका केली आहे. एवढंच नाही तर जेएनयू आणि इतर ठिकाणी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी आयोग नेमण्यात यावा आणि त्या आयोगाकडून या घटनांची चौकशी करण्यात यावी अशीही मागणी सोनिया गांधी यांनी केली.

“नव्या वर्षाची सुरुवातच संघर्ष, विद्यार्थ्यांना झालेली मारहाणीची घटना, आर्थिक समस्या, अपराध या सगळ्यांनी झाली आहे. CAA अर्थात सुधारित नागरिकत्व कायदा हा भेदभाव करणारा आणि धार्मिक विभाजन करणारा कायदा आहे. धर्माच्या आधारे भारतीयांचं विभाजन करणं हाच हा कायदा आणण्यामागचा मोदी सरकारचा उद्देश आहे” अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.

 

काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मांडले गेलेले चार प्रमुख मुद्दे

CAA, NRC बाबत मोदी सरकारकडून आणला जात असणारा दबाव, विरोध मोडून काढण्यासाठी सरकार कोणत्याही थराला जात असल्याचं समोर

देशाची अर्थव्यवस्था डबघाईला

जम्मू काश्मीरमध्ये सरकारने गेल्या सहा महिन्यांपासून अनेक गोष्टींवर बंदी घातली आहे त्यावरही चर्चा झाली

इराण आणि अमेरिका यांच्यात झालेल्या वादाबाबतही काँग्रेसच्या कार्यकारिणीत चर्चा झाली.

जेएनयू हिंसाचार प्रकरणाचा रिपोर्ट या बैठकीत काँग्रेसच्या फॅक्ट फाईंडिंग कमिटीने सोनिया गांधी यांना दिला. जेएनयू प्रकरणात विद्यापीठाच्या कुलगुरुंची भूमिका संशयास्पद आहे असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं आहे. ५ जानेवारी रोजी मास्क घातलेल्या काही जणांनी जेएनयूमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. या घटनेत २० विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते.

दरम्यान आज झालेल्या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, के.सी. वेणुगोपाल, महासचिव प्रियंका गांधी, ज्येष्ठ नेते अहमद पटेल, ए. के. अँटनी, मल्लिकार्जुन खर्गे आणि इतर नेत्यांची उपस्थिती होती. राहुल गांधी या बैठकीला उपस्थित नव्हते. याबाबत विचारलं असता, राहुल गांधी हे सध्या प्रवासात आहेत, उद्या सकाळी ते पक्ष कार्यालयात येतील तेव्हा त्यांना या बैठकीबाबत माहिती दिली जाईल असं रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2020 9:44 pm

Web Title: the caa is a discriminatory and divisive law says sonia gandhi scj 81
Next Stories
1 महाराष्ट्रात सीएए लागू करण्याचा प्रश्नच नाही, दोन मंत्र्यांचा विरोधी सूर
2 जे. पी. नड्डा होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, १९ फेब्रुवारी रोजी निवड प्रक्रिया
3 ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यात CAA,NRC आणि NPR वर चर्चा
Just Now!
X