फ्रेंच उद्योगपती बर्नार्ड तापी यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्षा ख्रिस्तिना लगार्द यांनी अवैधरीत्या सरकारी तिजोरीतून पैसे दिल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्या फ्रान्सच्या अर्थमंत्री असताना हे प्रकरण घडले होते.
अंशत सरकारी मालकीच्या ‘क्रेडिट लिओनीज’ या बँकेने आपल्या मालकीच्या ‘आदिदास’ या क्रीडा वस्त्रप्रावरण उत्पादक कंपनीचे मूल्यांकन कमी दाखवून आपल्याला फसविल्याचा आरोप तापी यांनी केला होता. ही कंपनी तापी यांनी १९९३ मध्ये विकली होती. त्यामुळे नुकसान झाल्याचा दावा करत त्यांनी भरपाईची मागणी केली होती. त्यांचा दावा मान्य करीत त्यांना ४०३ दशलक्ष युरो देण्याचा आदेश लगार्द यांनी बँकेला दिला होता. त्या वेळी त्या माजी राष्ट्राध्यक्ष निकोलाय सार्कोझी यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होत्या. तापी व सार्कोझी यांचे घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे या आदेशापाठीमागे गैरव्यवहार असल्याचा आरोप करीत लगार्द यांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. यानंतर न्यायालयाने तापी यांना बँकेला पैसे परत करण्याचा आदेश दिला. या खटल्यामुळे लगार्द यांना नाणेनिधी अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागण्याची शक्यता नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 18, 2015 3:59 am