भारताच्या लडाख भागात एप्रिलपासून सुमारे बारा-तेरा वेळा घुसखोरी करणाऱ्या चिनी सैन्याचे आक्रमण अजूनही सुरूच आहे. २० जुलै रोजी लेहच्या ईशान्येकडे असलेल्या भागात चिनी सैन्याने सीमा उल्लंघायचा प्रयत्न केला, मात्र भारतीय जवानांच्या सतर्कतेमुळे तो यशस्वी ठरू शकला नाही.
भारत-चीन सीमेवरील चुमार भागात चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’चे जवान काही लहान-लहान डोंगरांवर कब्जा मिळवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र डोंगर चढत असतानाच भारतीय लष्कराचे अस्तित्व जाणवताच त्यांनी माघार घेतली. या वेळी येथील आदिवासी भागात त्यांनी सुमारे पाच किलोमीटपर्यंत आत यायचे धाडस केले होते. शिवाय हा आपलाच भूभाग असल्याचा दावाही त्यांनी केला होता. भारतीय जवान आणि इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलाच्या जवानांशी सामना करायची वेळ आली, तेव्हा आपल्याला पीएलएच्या मुख्यालयातून या भागाची छायाचित्रे काढण्याचे फर्मान आले होते, म्हणून आम्ही असे केले, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, या भागातील भारतीय सैन्याच्या सर्व तुकडय़ांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गेले काही महिने चिनी सैन्याच्या कुरापतींचा सामना भारतीय लष्कराला करावा लागत आहे.

भारतीय जवानांचे औदार्य
चुमार प्रांतात २० जुलै रोजी घुसखोरी करणाऱ्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांकडे जेवणाची किंवा नाश्त्याची काहीही सोय नव्हती. ही बाब लक्षात येताच, तसेच त्यांच्याकडून कोणताही हल्ला न झाल्यामुळे भारतीय लष्कराने त्या जवानांना फळांच्या रसाचे कॅन दिले आणि त्यांना चीनच्या हद्दीत पिटाळून लावले, अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिली.