अरुणाचल प्रदेश येथून बेपत्ता झालेल्या पाच तरूणांना चीन आज (शनिवार) भारताकडे सोपवत आहे. प्राप्त माहितीनुसार  या तरूणांना चीनची पीपल्स लिबरेशन आर्मीच्या भारतीय लष्कराडे सोपवेल. या संदर्भात केंद्रीयमंत्री किरेन रिजीजू यांनी ट्वटिद्वारे माहिती दिली आहे.

या अगोदर चीनने या वृत्ताला दुजोरा दिली होता की, अरूणाचल प्रदेश येथून बेपत्ता झालेले पाच भारतीय तरूण त्यांच्या हद्दीत आढळले आहेत.तसेच, रिजाजू यांनी देखील या अगोदर माहिती दिली होती की, चिनी ‘पीएलए’ (पीपल्स लिबरेशन आर्मी)ने भारतीय सेनेकडून हॉटलाइनवर पाठवण्यात आलेल्या संदेशाला उत्तर दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले आहे की, बेपत्ता तरूण त्यांच्या भागात आढळले आहेत. आता या तरूणांना भारताकडे सोपवण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.

अरुणाचल प्रदेशचे काँग्रेसचे आमदार निनॉन्ग एरिंग यांनी मागील काही दिवसात दावा केला होती की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागातून पाच भारतीयांचे कथितरित्या अपहरण केले आहे. एरिंग यांनी पीएमओला टॅग करत आपल्या ट्विटमध्ये दावा केला होता की, अरुणाचल प्रदेशच्या सुबनसिरी जिल्ह्यातील पाच जणांचे अपहरण करण्यात आले आहे. त्यांनी भारत सरकारकडे तात्काळ कारवाईची मागणी देखील केली होती.

चीनमध्ये आढळलेल्या पाच तरूणांची नावं टोक सिंगकाम, प्रसात रिंगलिंग, डोंगटू एबिया, तानू बाकेर, नगारू दिरी अशी आहेत. या पाच तरूणांबाबत विचारणा केली असता चीनकडू सुरूवातीस उडवाउडवीची उत्तरे दिली गेली होती. तुम्ही जे सांगता आहात त्यातले मला काही माहिती नाही, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी या तरुणांच्या अपहरणाबाबत सांगितले होते. भारत-चीन दरम्यान सीमेवर संघर्ष तीव्र असताना ही घटना झाली आहे. मार्चमध्ये २१ वर्षीय युवकास पीपल्स लिबरेशन आर्मीने असापिला भागातून नेले होते.