रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदव यांची माहिती
रशिया व पाश्चिमात्य देशात नव्याने शीतयुद्ध सुरू झाले असून संबंध ताणले गेले आहेत असे रशियन पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी सांगितले.
युक्रेनमधील संघर्ष व रशियाचा सीरियातील राजवटीला पाठिंबा यामुळे ताणल्या गेलेल्या संबंधांवर भाष्य करताना त्यांनी म्युनिक सुरक्षा केंद्रात सांगितले की, नाटोच्या रशिया विरोधी धोरणामुळे पाश्चात्त्य देश आमच्या विरोधात असल्याचे दिसून येत आहे. अगदी स्पष्टच सांगायचे तर शीतयुद्धाचा नवीन कालखंड सुरू झाला आहे.
मेदवेदेव यांनी नाटोचा विस्तार व युरोपीय समुदायाचा मागील शीतयुद्धापासून तत्कालीन सोविएत शासित पूर्व युरोपातील प्रभाव या मुद्दय़ांच्या अनुषंगाने टीका केली आहे.
युरोपीय राजकारण्यांना असे वाटते की, युरोपच्या बाजूने अनेक देशांना ओढल्याने सुरक्षेची हमी मिळेल पण त्याचा परिणाम काय झाला तर मित्रांची फळी उभी राहिली नाही व काही देश दुरावले. विश्वास निर्माण करणे कठीण असते पण त्यासाठी सुरुवात करणे आवश्यक असते. आपली मते भिन्न असू शकतात पण ती चाळीस वर्षांपूर्वीइतकी युरोपात विभाजन होते तितकी भिन्न नसावीत.
पूर्व-पश्चिम संवादाचे आवाहन करून त्यांनी सांगितले की, पोप फ्रान्सिस व रशियाचे नेते किरील यांची क्युबात ऐतिहासिक भेट झाली. १९६० मध्ये आम्ही आण्विक दुर्घटनेच्या उंबरठय़ावर होतो पण राजकीय प्रणालीतील कुठलाही संघर्ष हा लाखो लोकांचे जीव घेणारा असू नये हे दोन्ही बाजूंना त्यावेळी कळले होते. नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टेनबर्ग यांनी सांगितले की, रशियाबरोबर तणावाचे प्रश्न वेगळे आहेत.
रशियाबाबत ठोस भूमिका घेतली जाईल पण संवादाचा मार्ग खुला आहे. युरोपातील सुरक्षा रशियाने कमकुवत केली आहे. नाटोला संघर्ष व नवे शीतयुद्ध नको आहे त्याचवेळी आम्ही मूग गिळून गप्प बसणार नाही. रशियाबाबत कठोर भूमिका घेऊ. कुणी आक्रमणाच्या धमकावण्या देऊ नयेत यासाठी आम्ही मोठी संरक्षक फळी उभारणार आहोत.
स्टोल्टेनबर्ग यांनी असा आरोप केला की, रशियाचे वागणे, बोलणे व आण्विक दलांच्या कारवाया शेजारी देशांना घाबरवणाऱ्या आहेत. त्यामुळे युरोपची सुरक्षा व स्थिरता धोक्यात आहे. नाटोच्या मते अण्वस्त्रांचा वापर अपवादात्मक स्थितीत होऊ शकतो, पारंपरिक युद्धात अण्वस्त्रे वापरता येतील या भ्रमात कुणी राहू नये. रशियाबरोबरच्या संघर्षांत आम्ही झोपेत आहोत असे समजू नये, त्या चिंता, समस्या मला माहिती आहेत पण येथे बोलू शकत नाही. रशियाने रचनात्मक व सहकार्याची भूमिका घेणे महत्त्वाचे आहे व संरक्षण-संवाद या दोन्हीत सध्याच्या प्रश्नांचे उत्तर सामावलेले आहे.