ट्विटरवर नेहमीच सक्रिय असणाऱ्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पुन्हा एकदा ट्विटरद्वारे एका जोडप्याची मदत केली आहे. कैलास मानसरोवर यात्रेसाठी निवड झालेल्या एका जोडप्याला स्वराज यांनी एकाच बॅचमध्ये जाण्याची परवानगी दिली आहे. यात्रेसाठीच्या यादीमध्ये पती-पत्नीची नावं वेगवेगळ्या तुकडीमध्ये टाकण्यात आली होती. दरवर्षी परराष्ट्र मंत्रालयाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेसाठी यात्रेकरूंची निवड ऑनलाईन पद्धतीने केली जाते.

यंदाच्या कैलाश मानसरोवर यात्रेसाठी चंदर नंदी आणि त्यांच्या पत्नीची निवड झाली होती. मात्र, १३ मे रोजी चंदन यांनी सुषमा स्वराज यांना मदत करण्यासाठी एक ट्विट केलं. आमची यात्रेसाठी निवड झालीये पण मला आणि माझ्या पत्नीला वेगवेगळ्या तुकडीमध्ये टाकण्यात आलं आहे. एकटीने प्रवास करणं पत्नीसाठी त्रासदायक ठरेल, असं ट्विट चंदर यांनी केलं होतं. दोघांना एकत्र यात्रेसाठी जाता यावं अशी विनंती त्यांनी केली होती.

चंदर यांच्या ट्विटला काही मिनिटांमध्येच सुषमा स्वराज यांनी उत्तर दिलं. तुम्हाला दोघांना वेगळं करणं ही संगणकाची चूक आहे. पण तुम्ही काळजी करु नका, आम्ही तुम्हाला दोघांनाही एकत्र पाठवू असं ट्विट स्वराज यांनी केलं आणि आणखी एका व्यक्तीची मदत केली.

काही दिवसांपूर्वीही ट्विटरवर मदत मागणाऱ्या एका काश्मिरी विद्यार्थ्याला दिलेल्या भन्नाट उत्तरामुळे स्वराज चर्चेत होत्या.

काय होतं हे प्रकरण-
शेख अतीक नावाच्या एका युजरने सुषमा स्वराज यांच्याकडे मदत मागितली. ट्विटमध्ये त्याने , ‘सुषमा जी मला तुमच्या मदतीची गरज आहे…मला भारतात माझ्या घरी परतायचंय, पण माझा पासपोर्ट खराब झालाय, मी विद्यार्थी असल्याने जास्त खर्च करु शकत नाही तसंच माझी प्रकृतीही ठिक नाहीये. तुम्ही काही करु शकतात का ?’असं म्हटलं.

त्याच्या ट्विटला उत्तर देताना सुषमा यांनी ट्विट केलं, ‘जर तुम्ही जम्मू-काश्मीरचे असतात तर मी नक्कीच तुमची मदत केली असती. मात्र तुमच्या प्रोफाईलनुसार तुम्ही भारतव्याप्त काश्मीरमध्ये राहतात, पण अशी कोणती जागाच नाहीये’.

सुषमांकडून आलेल्या उत्तरानंतर मदत मागणाऱ्या विद्यार्थ्याने तातडीने स्वतःची प्रोफाईल बदलली आणि भारतव्याप्त काश्मिरऐवजी जम्मू-काश्मिर असं केलं. त्यानंतर त्याने पुन्हा ट्विट करुन, मी जम्मू-काश्मिरचा असून फिलिपाइन्समध्ये शिक्षणासाठी आलो आहे असं म्हटलं. त्यानंतर प्रोफाईल बदलल्याबद्दल स्वराज यांनी आनंद व्यक्त केला आणि त्याच्या मदतीसाठी निर्देश दिले.