सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेस आणि विरोधीपक्ष करीत असलेल्या आंदोलनावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा त्यांच्यावर हल्लाबोल केला. काँग्रेस पाकिस्तानच्याविरोधात नव्हे तर तिथून भारतात आलेल्या पीडित शरणार्थींच्या विरोधात आंदोलन करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कर्नाटकातील तुमकूर येथे एका जाहीर सभेत ते बोलत होते.

मोदी म्हणाले, “विरोधक पाकिस्तानातून आलेल्या दलित, मागासवर्गीय आणि अन्याग्रस्तांच्याविरोधात आंदोलन करीत आहेत. पाकिस्तानचा जन्म धर्माच्या आधारावर झाला, तेव्हापासूनच दुसऱ्या धर्माच्या लोकांसोबत अत्याचाराला सुरुवात झाली होती. वेळेबरोबर पाकिस्तानात हिंदू, शीख, जैन, बोद्ध आणि ख्रिश्चनांवर सातत्याने अत्याचार होत राहिला आहे. तिथल्या लाखो लोकांना आपलं घर सोडून भारतात यावं लागलं. पाकिस्तानने या लोकांवर अत्याचार केला. मात्र, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष पाकिस्तानविरोधात नव्हे तर या पीडितांविरोधातच आंदोलन करीत आहेत.”

“शरण आलेल्या लोकांविरोधातच रॅली काढल्या जात आहेत. मात्र, ज्या पाकिस्तानने तिथल्या अल्पसंख्यांकांवर अत्याचार केले, त्यावर त्यांच्या तोंडाला शेवटपर्यंत कुलूप का लावले आहे. पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींची मदत करणे हे आमचं कर्तव्य आहे. पाकिस्तानातून आलेले हिंदू आणि त्यातील बहुतेक दलितांना आम्ही त्यांच्या नशिबाच्या हवाले सोडू शकत नाही,” असेही मोदी यावेळी म्हणाले.

मोदी म्हणाले, “जे लोक आज संसदेविरोधात आंदोलन करीत आहेत. त्यांनी पाकिस्तानातून आलेले शीख, जैन आणि ख्रिश्चन कुटुंबांची मदत करावी. त्यांना मी सांगू इच्छितो की, आज पाकिस्तानचा बुरखा फाडण्याची गरज आहे. आंदोलन करायचेच असेल तर आपल्याला गेल्या ७० वर्षातील कामगिरीच्याविरोधात करायला हवं.”

दरम्यान, मोदींनी या सभेपूर्वी श्री सिद्धगंगा मठाचे संत शिवकुमार स्वामी यांना श्रद्धांजली वाहिली. संतांना दाखवलेल्या मार्गामुळेच आपण २१ व्या शतकातील तिसऱ्या दशकात आशा आणि उत्साहाने पाऊल ठेवले आहे. गेल्या दशकाची सुरुवात आपण कोणत्या वातावरणात झाली होती आणि आता काय स्थिती आहे, असे यावेळी मोदी म्हणाले.