भारतात फैलाव झालेला बी.१.६१७ हा करोना विषाणूचा प्रकार ४४ देशात पसरला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. दरम्यान ही जागतिक पातळीवर चिंतेची बाब असल्याचे संघटनेने मंगळवारीच जाहीर करताना या विषाणूला ‘व्हेरिएंट ऑफ कन्सर्न’ या गटात टाकले आहे.

संयुक्त राष्ट्रांची संस्था असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की दोन उत्परिवर्तनांमुळे या विषाणूची संसर्गजन्यता जास्त आहे. त्या दृष्टिकोनातून त्याचा समावेश या गटात करण्यात आला आहे. ११ मे पर्यंत जनुकीय क्रमवारीचे ४५०० नमुने ‘गिसएड’ या जागतिक माहिती संचात टाकण्यात आले असून त्यात ४४ देशांमध्ये व सहा विभागात हा विषाणू पसरल्याचे दिसून आले आहे. ‘गिसएड’ हा जागतिक वैज्ञानिक उपक्रम असून त्यात विषाणूच्या जनुकीय क्रमवारीची माहिती जमा करण्यात येत असते. जागतिक आरोग्य संघटनेने बी.१.६१७ हा जागतिक चिंता निर्माण करणारा विषाणू असल्याचे जाहीर केल्यानंतर तो धोकादायक असल्याचे स्पष्ट  झाले आहे. चीनमध्येमध्ये सापडलेल्या मूळ विषाणूपेक्षा हा विषाणू पूर्णपणे वेगळा असून त्यात दोन उत्परिवर्तने झाली असून त्याची संसर्गजन्यता, घातकता, लशींचा प्रतिरोध जास्त आहे. सुरुवातीला या विषाणूत दोन उत्परिवर्तने दिसली असली तरी आता ती तीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा विषाणू ऑक्टोबर २०२० मध्ये प्रथम भारतात सापडला होता. त्यानंतर डिसेंबरमध्ये त्यात पुन्हा बदल झाले.