संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सुरळीतपणे पार पडेल आणि रचनात्मक संवाद दोन्ही बाजूंनी होईल, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्यक्त केली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मंगळवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. तत्पूर्वी संसदेच्या परिसरात पत्रकारांशी बोलताना नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्ष गंभीर आणि मजबूत असेल, तर लोकशाही सशक्त होते, असे सांगितले.
ते म्हणाले, संसदेच्या कामकाजाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेकडे देशाप्रमाणेच जगाचेही लक्ष आहे. त्यामुळे अधिवेशनाचे कामकाज सुरळीतपणे पार पडावे, अशी आपली अपेक्षा आहे. विरोधकांशी संवाद सुरू आहे. संसदेमध्ये विविध विषयांवर गंभीरपणे सखोल चर्चा झाली पाहिजे. सरकारच्या कमतरतांवरही चर्चा झाली पाहिजे. दोन्ही बाजूंनी साधकबाधक चर्चा होऊन कामकाजा सदुपयोग होईल, अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आजपासून सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात येत्या गुरुवारी लोकसभेमध्ये रेल्वे अर्थसंकल्प सादर करण्यात येणार असून, २९ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली पुढील आर्थिक वर्षासाठी सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेमध्ये सादर करतील.