केंद्र सरकाच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी संघटनांच्या तीव्र आंदोलनामुळे देशातील राजकारण देखील तापले आहे. तर, शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन कोणत्याही परिस्थितीत सुरूच ठेवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर, आंदोलनात १७ दिवसांमध्ये ११ शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागलं आहे, मात्र तरी देखील मोदी सरकारच्या हृदयाला पाझर फुटला नसल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.

काँग्रेसन प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटद्वारे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “मागील १७ दिवसांमध्ये ११ शेतकरी बांधवांच्या बलिदानानंतरही निरंकुश मोदी सरकारच्या हृदयाला पाझर फुटलेला नाही. ते अजूनही अन्नदात्यांबरोबर नाहीतर धनदात्यांबरोबरच का आहेत? देशाला जाणून घ्यायचं आहे, ‘राजधर्म’ मोठा की ‘राजहट्ट’?” असं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

तर, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला असून, कृषी कायदे रद्द करण्यासाठी आणखी किती शेतकरी बांधवांना बलिदान द्याव लागेल? असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

“आणखी किती शेतकऱ्यांना बलिदान द्यावं लागेल?”

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या संवैधानिक वैधतेला आव्हान देणाऱ्या प्रलंबित याचिकांमध्ये पक्षकार करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान युनियनने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

केंद्र सरकारने केलेले नवे कृषी कायदे असंवैधानिक, शेतकरीविरोधी आहेत. या कायद्यांमुळे मोठय़ा कंपन्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या लालसेपुढे शेतकरी हतबल ठरेल. हे कायदे शेतक ऱ्यांच्या हिताचे नाहीत, तर त्यामागे कंपन्यांचे हित साधण्याचा कुटिल हेतू आहे, असे भारतीय किसान युनियनने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत नमूद केले आहे.