पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई दलाने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थानमधील चुरू येथे पहिल्यांदाच बोलत आहेत. यावेळी त्यांनी देशवासियांना देश सुरक्षित हातात असल्याचा विश्वास दिला. यावेळी त्यांनी २०१४ मध्ये उच्चारलेल्या त्या कवितेच्या ओळी पुन्हा एकदा म्हणून दाखवल्या. ते म्हणाले, सौगंद है मुझे इस मिट्टी की, मै देश नही मिटने दुंगा… मै देश नही रुकने दुंगा… मै देश नही झुकने दुंगा…

राजस्थानातील चुरू येथील एका सभेत बोलताना मोदी म्हणाले, मी देशवासियांना विश्वास देतो की, देश सुरक्षित हातांमध्ये आहे. पक्षापेक्षा आम्ही देशाला प्राधान्य देतो. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या जवानांना माझे शतशः प्रणाम.

मोदी म्हणाले, आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा केला. मात्र, त्यात राजस्थानमधील एकाही शेतकऱ्याचे नाव नाही. कारण इथल्या काँग्रेस सरकारने याची यादीच केंद्र सरकारकडे पाठवलेली नाही. पुढील दहा वर्षात साडेसात लाख करोड रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना काहीही करायची गरज नाही. त्यांना केवळ पैसे जमा झाल्याचा संदेश त्यांच्या मोबाईलवर येईल.

१ फेब्रुवारीला या योजनेची घोषणा आम्ही केली होती. त्यावेळी काही लोक म्हणाले होते की हे होऊच शकत नाही. मात्र आता सगळ काही शक्य आहे कारण हे २५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता पोहोचला. शेतकऱ्यांचे कल्याण आमची प्राथमिकता आहे. मात्र, त्यावर राजकारण केल्यास दुःख होते. त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजनेतही ५ लाख रुपयांचा इलाज निश्चित केला जात आहे. मात्र, यातही राजस्थानच्या एकाही जणाचे नाव नाही. कारण इथल्या काँग्रेस सरकारने या योजनेशी जोडण्यास गांभीर्य दाखवले नाही, अशा शब्दांत त्यांनी यावेळी काँग्रेसवर टीका केली.