युपीए सरकारच्या काळात तीन वर्षे आत्तासारख्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती होत्या. मात्र, आमच्या सरकारच्या काळात केवळ तीन दिवसांतच ते वैतागले आहेत. इंधनाच्या किंमती नियंत्रण रहाव्यात यासाठी सरकार दीर्घकालीन उपाययोजनांवर विचार करीत आहे, असे भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी सांगितले. मोदी सरकारला ४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शाह म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुका शिवसेना-भाजपाने एकत्र लढवाव्यात अशी आमची इच्छा आहे. जर तुम्ही शिवसेनेला याबाबत प्रश्न विचारल्यास त्यांना एकत्र लढायचे नाही असे ते सांगतात. मात्र, असे असले तरीही ते महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपासोबत सत्तेत आहेत, असा टोला यावेळी शाह यांनी शिवसेनेला हाणला.

एनडीएबाबत बोलताना शाह म्हणाले, नितीशकुमार यांचा जनता दल युनायडेट हा पक्ष एनडीए सामिल झाला. त्याचबरोबर २०१४ नंतर इतर ११ आणखी पक्ष एनडीएचा भाग झाले आहेत. त्यामुळे एनडीएचे कुटुंब वाढले आहे घटलेले नाही. यांपैकी केवळ तेलगू देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे एनडीएतून बाहेर पडले आहेत.

मोदी सरकारच्या ४ वर्षांची कामगिरी सांगताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन सरकारचे वाभाडे काढले होते. त्यावर बोलताना शाह म्हणाले, राहुल गांधी विरोधी पक्षात आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार? ते थेडेच आमच्या बाजूने बोलणार आहेत. उलट, आम्ही तथ्य आणि आकडेवारी समोर ठेवली असून याला कोणीही आव्हान देऊ शकते.

भारत-पाक सीमेवर वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शाह म्हणाले, भाजपाने युद्ध हा शेवटचा पर्याय ठेवला आहे. आपल्या सीमांच्या सुरक्षेसाठी आम्ही कुठलीही तडजोड करायला तयार नाही. भाजपा सरकारच्या काळातच दहशतवादाला मोठे प्रत्युत्तर देण्यात आले असून सर्वाधिक दहशतवाद्यांचा खात्मा आमच्या सरकारच्या काळातच करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बोलताना शाह म्हणाले, भाजपाने सर्वाधिक मेहनती पंतप्रधान आणि जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता या देशाला दिला आहे. आपले पंतप्रधान प्रतिदिन १५ ते १८ तास काम करतात. त्यामुळे आम्हाला अभिमान आहे की, असा पंतप्रधान भाजपाचा नेता आहे.