अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या काळातच ईशान्य भारताचा विकास झाला, आता त्यांचेच काम मी पुढे नेणार आहे. आमच्या मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी आजवर या भागाला १५० वेळा भेटी दिल्या आहेत. तसेच या भागाच्या विकासासाठी अनेक प्रकल्प त्यांनी या ठिकाणी उभारले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मिझोरामची राजधानी एजॉल येथे ते बोलत होते. विविध विकास कामांच्या उद्घाटनांसाठी मोदी सध्या ईशान्य भारताच्या दौऱ्यावर आहेत.

पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच मिझोरामच्या दौऱ्यावर गेले आहेत. येथे त्यांचे आगमन झाल्यानंतर मिझोरामचे राज्यपाल निवृत्त लेफ्ट. जनरल निर्भय शर्मा आणि मुख्यमंत्री लाल थानहवला यांनी मोदींचे लेंगपुई विमानतळावर स्वागत केले. त्यानंतर त्यांनी मिझोरामच्या सौंदर्याचे तसेच इथल्या जनतेचे आभार मानले. तसेच येथील जनतेला नाताळाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, मिझोरामच्या विकासात महत्वपूर्ण भुमिका बजावणाऱ्या हायड्रोपावर प्रकल्पाचे ते उद्घाटन करणार आहेत.

मोदी म्हणाले, ईशान्य भारतातील लोकांना त्यांच्या तक्रारी घेऊन दिल्लीला येण्याची गरज नाही. तर दिल्लीतील संबंधीत व्यक्तीच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्याकडे येतील. यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असून त्याचे ‘डोनर मंत्रालय’ (मिनिस्ट्री फॉर डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्ट रिजन) असे नामकरण करण्यात आले आहे. तुईरिअर हायड्रोपावर प्रकल्प हा यशस्वीरित्या राबवण्यात आलेला केंद्र सरकारचा पहिला महत्वाचा प्रकल्प असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

१९९८ मध्ये वाजपेयींच्या काळात या प्रकल्पाला पहिल्यांदा मंजूरी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर प्रकल्प रखडला. या प्रकल्पाची पुर्तता हा आमच्या बांधिलकीचे प्रतिबिंब आहे. यामुळे ईशान्य भारतात आता नव्या विकासपर्वाला सुरुवात झाली आहे. आम्ही भारतमाला प्रकल्पाच्या माध्यमांतून ईशान्य भारतासाठी महामार्ग आणि रस्त्यांचे जाळे निर्माण करीत आहेत. केंद्र सरकार पूर्व राज्यांचे धोरण अवलंबत आहे. दक्षिण-पूर्व आशियातील व्यापारासाठी ही महत्वाची बाब असून यामध्ये मिझोरामचे महत्व असून म्यानमार आणि बांगलादेश यांच्यादरम्यान व्यापारासाठी हे महत्वाचे ठिकाण असल्याचे यावेळी मोदींनी सांगितले.