सर्वानी धास्ती घेतलेला व महाराष्ट्रातील रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात आढळलेला दोन उत्परिवर्तने असलेला विषाणू आता भारतात  इतर उत्परिवर्तित  विषाणू प्रकारांसमवेत सर्वत्रच आढळून येत आहे. तो एका राज्यापुरता मर्यादित राहिला नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. आतापर्यंत भारतीय वैज्ञानिकांनी भारतातील करोना विषाणू प्रकारांची जी क्रमवारी तपासली आहे त्याची माहिती जाहीर केली असून ती जागतिक माहिती संचयिकेत जमा करण्यात आली आहे.

वैज्ञानिकांनी सादर केलेल्या विषाणूंच्या जनुकीय क्रमवारीवरून पहिल्यांदाच विषाणूंमध्ये कशा प्रकारे उत्परिवर्तने होत गेली हे स्पष्ट झाले असून दुहेरी उत्परिवर्तन असलेल्या बी.१.६१७ हा विषाणू प्रामुख्याने २ एप्रिलपूर्वीच्या साठ दिवसातील नमुन्यांमध्ये २४ टक्के प्रमाणात आढळून आला आहे. ५ ऑक्टोबरला हा दुहेरी उत्परिवर्तनाचा विषाणू पहिल्यांदा आढळून आला होता. त्यानंतर काही काळ तो कमी प्रमाणात सापडत होता, पण जानेवारीत चाचण्या वाढल्यानंतर नमुने जेव्हा क्रमवारीसाठी पाठवले जाऊ लागले तेव्हा त्याचे प्रमाण वाढलेले दिसले. १ एप्रिलपर्यंत क्रमवारी लावण्यात आलेल्या विषाणूंची जी माहिती जागतिक संचयिकेकडे पाठवण्यात आली त्यात ८० टक्के विषाणू हे दुहेरी उत्परिवर्तनाचे होते. ‘गिसेड’ या जागतिक संचयिकेकडे म्हणजे डेटाबेसकडे ही माहिती पाठवली जात आहे. ब्रिटनमधील बी.१.१.७ हा विषाणू साठ दिवसातील १३ टक्के नमुन्यात आढळून आल्याचे स्क्रीप्स रीसर्च संस्थेने म्हटले आहे. हे दोन्ही कल भारतासाठी घातक असून बी.१.६१७ हा दुहेरी उत्परिवर्तनाचा विषाणू महाराष्ट्रातील सर्वाधिक नमुन्यात आढळून आला आहे. ७ एप्रिलपर्यंत महाराष्ट्र हे दुसऱ्या लाटेतील प्रमुख उद्रेक ठिकाण होते. या काळात या विषाणूचा समावेश असलेले आणखी रुग्ण सापडले आहेत. पण असे असले तरी घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण सार्स सीओव्ही २ विषाणूचे यादृच्छिक उत्परिवर्तन नमुने घेऊन ही तपासणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा विषाणू आता सर्वत्र आढळला असला तरी तो एक अंदाज आहे असा याचा अर्थ सांगितला जात आहे. क्रमवारी लावण्यात आलेली सर्व माहिती त्या संस्थेच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली व त्यातून एवढे नमुने या विषाणूचे आहेत किंवा नाही हे समजलेले नाही. त्याबाबत संदिग्धता आहे. बी.१.६१७ हा विषाणू तुलनेने इतर नमुन्यांपेक्षा जास्त दिसून येत आहे.

भारतातील जनुकीय क्रमवारीशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जागतिक पातळीवर संकलित करण्यात आलेली ही माहिती आम्ही सांगितलेल्या प्रचलित कलानुसारच आहे. महाराष्ट्रातील ६० ते ८० टक्के नमुने हे या विषाणूचे असून गुजरातेतही त्याचे प्रमाण असेच जास्त आहे. डिसेंबरमध्ये त्याचे प्रमाण १० ते २० टक्क्य़ांच्या खाली होते, आता तो सगळीकडे दिसून येत आहे, असे इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायॉलॉजी या संस्थेचे अनुराग अग्रवाल यांनी म्हटले आहे.

भारतात सध्या विषाणूंच्या क्रमवारीवर ‘इन्साकॉग’ ही संस्था देखरेख करीत आहे, त्यातील दहा  प्रयोगशाळांत अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील प्रयोगशाळेचा समावेश आहे. आता कुठल्या प्रकारच्या उत्परिवर्तनाचा विषाणू कुठे जास्त आहे हे समजले असून बी.१.६१२७ विषाणू पश्चिमेकडील महाराष्ट्र व गुजरात राज्यात आहे. बी.१.१.७ हा विषाणू उत्तरेकडील पंजाबमध्ये आहे. दक्षिणेकडे एन ४४० के या उत्परिवर्तनाचा विषाणू आहे, पण तो फारसा आक्रमक नाही. कालांतराने हे विषाणू प्रदेश बदलू शकतात.  दक्षिण आफ्रिकेतील विषाणू बांगलादेशात सापडला असून तेथे त्याचे ८० टक्के रुग्ण आहेत. तो विषाणू कोव्हिशिल्ड म्हणजे अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लशीलाही फारशी दाद देत नाही. इ ४८४ क्यू व एल ४५२ आर ही उत्परिवर्तने असलेले विषाणूही आहेत. त्यामुळे विषाणू पेशीत लवकर प्रवेश करू शकतो. एल ४५२ आर हा विषाणू कॅलिफोर्नियातही आढळला होता.  त्याने त्या भागात थैमान घातले होते, असे भारताचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी सांगितले.  बी.१.१६७ हा विषाणू व्हीओसी म्हणजे सावधगिरीची बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रुग्णसंख्यावाढीची इतरही कारणे

इन्साकॉगमधील सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायॉलॉजी या संस्थेचे डॉ. राकेश मिश्रा यांनी सांगितले, की दुहेरी उत्परिवर्तनचा विषाणू देशात वाढत आहे. पण रुग्णसंख्येतील वाढीला ते एकमेव कारण नाही. मानवी वर्तनाचा त्यात संबंध आहे. नियमांचे उल्लंघन करण्याने रुग्ण संख्या वाढत आहे.

नागरिकांचे बेजबाबदार वर्तन

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ बायोमेडिकल जिनॉमिक्स या  संस्थेचे संचालक डॉ. सौमित्र दास यांनी सांगितले की, नवीन विषाणू प्रकाराचा संबंध हा वेगाने पसरणाऱ्या करोनाशी जोडता येणार नाही. दुसरी लाट ही लोकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे आली आहे.

तुलनात्मक प्रमाण

ऑउट ब्रेक डॉट इन्फो या संस्थेच्या माहितीनुसार  पश्चिम बंगालमध्ये बी. १.६१७ या विषाणूचे प्रमाण जास्त आहे. ११७ म्हणजे ९ टक्के नमुन्यात तो दिसून आला. महाराष्ट्रात १२० म्हणजे ६ टक्के नमुन्यात तो दिसून आला. जगात बी.१.६१७ हा विषाणू ४०८ नमुन्यांमध्ये दिसून आला आहे. त्यातील २६५ भारतातील असून एकूण ८४५५ नमुन्यांची जनुकीय क्रमवारी  लावण्यात आली, असे ‘आउटब्रेक डॉट इन्फो’च्या अहवालात म्हटले आहे.