नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा मसुदा आधी सर्वांना दाखवायला हवा होता. तो दाखवला असता तर संसदीय समितीकडे पाठवण्यात आला असता. मात्र, असं न करता सरकार ते मंजूर करुन घेण्यासाठी घाई का करतयं? असा सवाल काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी राज्यसभेत केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी राज्यसभेत हे विधेयक मांडले त्यावर चर्चेदरम्यान ते बोलत होते.


शर्मा म्हणाले, “सरकारचे म्हणणे आहे की सर्वांशी चर्चा झाली आहे. मात्र, मी याच्याशी सहमत नाही. आपण म्हटलं की हे ऐतिहासिक विधेयक आहे. मग याकडे इतिहास कोणत्या दृष्टीनं पाहिल हे आता काळंच ठरवेल. आम्ही याचा विरोध करीत आहोत. विरोधाचे कारण राजकीय नव्हे तर संविधानिक आणि नैतिक आहे. कारण, हे विधेयक भारताच्या मूळ आत्म्यावर आघात करणारे आहे. हे आपल्या प्रजासत्ताकाच्या पवित्र संविधानाच्या प्रस्तावनेच्या विरुद्ध आहे.

फाळणीचे शल्य संपूर्ण देशाला होते. त्यामुळे आज आपण हे म्हणू शकतो का की, संविधान निर्मात्यांना नागरिकत्वाबाबत समज नव्हती. फाळणीच्या काळात जे लाखो लोक भारतात आले त्यांना सन्मान मिळाला नाही का? फाळणीची झळ बसलेल्या कुटुंबातील दोन लोक भारताचे पंतप्रधानही झाले एक मनमोहन सिंग आणि आय. के. गुजराल, असे आनंद शर्मा यांनी चर्चा करताना म्हटले.

अमित शाहांच्या आरोपांना उत्तर देताना शर्मा म्हणाले, आपण फाळणीचा दोष काँग्रेसच्या त्या नेत्यांना दिला ज्यांनी अनेक वर्ष तुरुंगात घालवली. हिंदू महासभा आणि मुस्लिम लीगने देखील या फाळणीचे समर्थन केले होते. काँग्रेस तर कायमच फाळणीच्या विरोधात राहिली आहे. आपण म्हणता राजकारण व्हायला नको तर मग तुम्ही करताय ते राजकारणही व्हायला नको. महात्मा गांधींच्या नेतृत्वात ही लढाई लढली गेली त्यात सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस हे देखील सामील होते. त्यांचे योगदान नाकारणे म्हणजे इतिहास नाकारल्यासारखे आहे.

आपण इतिहास लिहिण्याचा प्रोजेक्ट कोणाला दिला आहे, अशा शब्दांत शर्मा यांनी शाह यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच ते पुढे म्हणाले की, औपचारिकरित्या सावरकरांनी देखील घोषणा केली होती की जिन्ना यांची टू नेशन थेअरीवर मला कोणताही आक्षेप नाही.