माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांना ताब्यात घेण्यासाठी राजधानी दिल्लीत त्यांच्या निवास्थानी सीबीआय पथक दाखल झाले होते. यावेळी निवसास्थानाबाहेर मोठ्याप्रमाणात गोंधळ सुरू होता. तर, काही वेळापूर्वीच पी चिदंबरम हे २७ तासांनंतर समोर आले होते. त्यांनी काँग्रेस कार्यालयात दाखल होत पत्रकार परिषद घेऊन आपण लपत नसल्याचे सांगत, वकिलांसोबत मिळून न्यायालयात लढण्याची तयारी करत असल्याचे म्हटले होते व यानंतर ते तातडीने त्यांच्या निवास्थानी गेले होते. या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पी चिदंबरम यांचे सुपूत्र कार्ती चिदंबरम यांनी हे सर्व नाटक केवळ काही जणांना खूश करण्यासाठी केले जात असल्याचे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

कार्ती चिदंबरम यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, तपास यंत्रणांकडून केले जात असलेले हे नाटक व तमाशा केवळ वातावरण निर्मितीसाठी आणि काहीजणांना खूश करण्यासाठी आहे. तसेच,  या संकटाच्या क्षणी पाठींबा दिल्याबद्दल त्यांनी काँग्रेस, राहुल गांधी, प्रियंका गांधी, कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांचे आभारही व्यक्त केले. शिवाय माझ्यावर चार वेळा छापे टाकण्यात आले. २० पेक्षा जास्त वेळा सीबीआयसमोर हजर झालो. प्रत्येक वेळी त्यांनी किमान १० ते १२ तास जाबजबाब घेतले. १२ दिवस सीबीआयचा ‘पाहुणा’ म्हणूनही राहिलो आहे. २००८ मध्ये घडलेल्या कथित घटनांबाबत २०१७ मध्ये साधे आरोपपत्र व एफआयआरही दाखल झाला नव्हता. त्यामुळे याप्रकरणात काहीच तथ्य नाही, असेही म्हटले.

आयएनएक्स मीडिया प्रकरणी पी चिदंबरम यांच्याविरोधात ईडी आणि सीबीआयने लूकआऊट नोटीस जारी केली होती. ईडीचे अधिकारी पी चिदंबरम यांच्या अटकेसाठी गेले होते. मात्र पी चिदंबरम घरी नसल्याने त्यांना मोकळ्या हाती परतावं लागलं होतं. यानंतर पी चिदंबरम नेमके कुठे आहेत याची चर्चा सुरु होती. पण अखेर नाट्यमयरित्या पी चिदंबरम समोर आले व त्यांनी आपली बाजू मांडली होती. अवघ्या पाच मिनिटांत त्यांनी आपली पत्रकार परिषद संपवली होती.