आठ बॉम्बस्फोटांच्या मालिकेने हादरलेल्या श्रीलंकेतील कोलंबो शहरात शेकडो लोकांना जीव गमवावा लागला. या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण जगाला हादरवून टाकले. दरम्यान, रविवारी सकाळी झालेल्या या घटनेनंतर रात्री पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरवरील रोषणाई बंद करुन या घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली.


त्याचबरोबर बिहारमधील बोधगया येथील आंतरराष्ट्रीय महाबोधी विहारात बौद्ध भिक्खूंनी या स्फोटांतील पीडितांसाठी प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. रविवारी रात्री उशीरा आयोजित करण्यात आलेल्या या प्रार्थना सभेत बौद्ध भुक्खूंनी शांततेचे प्रतिक असलेला कॅण्डल मार्च काढला आणि मृतांना श्रद्धांजली वाहिली.


या स्फोटांसाठी कोलंबो शहरातील सेंट अॅन्थोनी चर्च, सेंट सेबेस्टिअन चर्च, पश्चिम किनारी भाग नेगोंबो, सेंट मायकल चर्च, पूर्व किनारी भाग बट्टीकलोआ चर्च तसेच शांग्रीला, सिनामन ग्रँड आणि किंग्सबरी या हॉटेलांना निशाना बनवण्यात आले होते.