केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला गेला आणि त्यानंतर लोकसभेत त्यावर चर्चा सुरू झाली. या चर्चेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्रमक भाषण केले आणि आपली भूमिका मांडून झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गळाभेटही घेतली. राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाएवढीच त्यांची गळाभेट हा आज दिवसभर चर्चेचा विषय ठरली. पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या या गळाभेटीची आणि त्यांच्या डोळे मिचकवण्याची आपल्या भाषणात खिल्ली उडवली.

आज टीव्हीवर सगळ्या देशाने डोळ्यांचा खेळ पाहिला, कधी डोळे मारले जात होते तर कधी उघडले जात होते असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांना लगावला. आपल्या भाषणात त्यांनी विरोधकांचे सगळे आरोप फेटाळून लावत अविश्वास ठरावच रद्द करावा अशी मागणी केली. विरोधक गदारोळ करत होते आणि त्याच गदारोळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे भाषण केले. रोजगाराचा प्रश्न, जीएसटी, नोटाबंदी आणि विकास या सगळ्याच मुद्द्यांवर विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले. या सरकारला जनतेशी काहीही देणेघेणे नाही अशीही टीका राहुल गांधींसह प्रमुख विरोधी पक्षाच्या खासदारांनी केली. मात्र हे सगळे आरोप खोडून काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले म्हणणे मांडले.