काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीयस्तरावर उचलणाऱ्या पाकिस्तानचे प्रयत्न सगळीकडे अयशस्वी ठरल्यानंतर आता, युरोपियन युनियनच्या संसदेतही पाकिस्तनाच्या कुरापतींवर ताशेरे ओढल्या गेले आहे. अभिमानास्पद बाब म्हणजे काश्मीरमुद्यावरून युरोपियन युनियनमधील सदस्यांकडून भारताची बाजू घेण्यात आली व भारताला पाठबळ देण्याबाबतही बोलल्या गेले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीयस्तरावर पाकिस्तानला हा आणखी एक मोठा धक्का आहे.

कलम ३७० हटवल्यापासून चवताळलेल्या पाकिस्तानकडून सातत्याने भारतविरोधी सुर आळवला जात आहे. हा मुद्दा घेऊन पाकिस्तान जगभर फिरत आहे. मात्र कुठलेही राष्ट्र किंवा कोणतीही आंतरराष्ट्रीयसंघटना या मुद्यावरून पाकिस्तानला ठामपणे पाठिंबा देत नसल्याचे दिसत आहे. बुधवारी युरोपियन युनियनच्या संसदेत देखील या मुद्यावर चर्चा झाली तेव्हा बहुतांश संसद सदस्यांनी भारताची बाजू लावून धरली होती. तर पाकिस्तान एक संदिग्ध राष्ट्र असल्याचे म्हटले गेले. पाकिस्तान या अगोदर देखील काश्मीर मुद्यावरून संयुक्त राष्ट्र परिषदेत तोंडघशी पडलेला आहे.

युरोपियन संसदेने म्हटले की, काश्मीर मुद्यावर दोन्ही देशांनी थेट चर्चा करायला हवी. जेणेकरून यावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढला जाऊ शकेल. शिवाय यावेळी हे देखील स्पष्ट करण्यात आले की, या मुद्यावर कोणी तिसऱ्याने हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच येत नाही. युरोपियन संसदेत ११ वर्षात प्रथमच काश्मीर मुद्यावर चर्चा झाली. या अगोदर काश्मीर मुद्यावर चीनने पाकिस्तानला समर्थन दिले होते.

यावेळी भारताला जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असल्याचे संबोधत, युरोपियन युनियनने असे निदर्शनास आणून दिले की, या देशाला वर्षानुवर्षे किती दहशतवादी कारवायांचा सामना करावा लागला आहे. याकडे आपण लक्ष देणे गरजेचे आहे.

चंद्रावरून नाही येत दहशतवादी, शेजारच्या देशातून येतात –
पोलंडच्या रिजार्ड जारनेकी यांनी म्हटले की, भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आपल्याला भारताच्या जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. हे दहशतवादी काही चंद्रावरून येत नाहीत, तर ते शेजारच्या देशातून येत आहेत. आपल्याला भारताला पाठबळ द्यायला हवे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

पाकिस्तानातच आखली जाते दहशतवाद्यांकडून हल्ल्याची योजना
इटलीच्या फुलवायो मार्तसिलो यांनी म्हटले की, पाकिस्तानने अणवस्र वापराची धमकी दिली आहे. शिवाय पाकिस्तान असे ठिकाण आहे जिथे दहशतवादी कोणतीही भीती न बाळगता, युरोपात दहशतवादी हल्ले घडवण्यासाठी योजना आखू शकतात. पाकिस्तानात मानवाधिकारांचे मोठ्याप्रमाणात उल्लंघन होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा : मदत मागणाऱ्या पाकिस्तानला मुस्लीम देशांची ताकीद; बॅकडोअर डिप्लोमसीचा वापर करा

एकूणच काश्मीर मुद्यावर पाकिस्तान आंतरराष्ट्रीयस्तरावर सातत्याने तोंडघशी पडत असल्याचे दिसत आहे. मात्र तरी देखील पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हा मुद्दा आपण सोडणार नसल्याचे म्हणत आहे. आतातर पाकिस्तानचा मित्र राष्ट्र चीन देखील या मुद्यावरून काहीसा सावध भूमिका घेत आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील पाकिस्तानचे माजी राजदूत हुसैन हक्कानी यांनी देखील असे म्हटले होते की, आंतरराष्ट्रीयस्तरावर पाकिस्तानची प्रतिमा खराब होण्यास पंतप्रधान इम्रान खान हेच जबाबदार आहेत.