सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर मागील काही दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनास देशभरातून पाठिंबा मिळताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे विद्यार्थी देखील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी, आंदोलनस्थळी पोहचले होते. मात्र त्यांना आंदोलक शेतकऱ्यांनी परत पाठवल्याचे समोर आले आहे.

यूपी गेट (गाजियाबाद) – गाजीपूर (दिल्ली) बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी जामियाच्या विद्यार्थांचा पाठिंबा घेण्यास नकार दिला. या विद्यार्थ्यांमध्ये एका तरूणीसह एकूण सहाजण आंदोलनस्थळी पोहचले होते.

आणखी वाचा- Farmer Protest: संघ परिवारातील संस्थेचा शेतकऱ्यांना पाठिंबा

डीएसपी अंशू जैन यांच्या मते जेव्हा आंदोलनस्थळी या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला, तेव्हा पोलिसांनी या विद्यार्थ्यांना परत पाठवले. भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी सांगितले की, सरकार शेतकऱ्यांची एकजुट तोडू इच्छित आहे. कृषी कायद्यांच्या विरोधासाठी शेतकरी अजूनही आंदोलनस्थळी येत आहेत. हे आंदोलन ऐतिहासिक ठरणार आहे. तसेच, सोमावारी(आज) शेतकरी सकाळी आठ वाजेपासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपोषण करणार असून, सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर देखील आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा- “ते जर शेतकरी नसतील तर…”; चिदंबरम यांचा मोदी सरकारला कोंडीत पकडणारा सवाल

हरियाणातील चरखी दादरीचे अपक्ष आमदार सोमवीर सांगवान, राष्ट्रीय वाल्मिकी महासंघ शादीपुर, दिल्लीचे अध्यक्ष मदनलाल वाल्मिकी यांनी देखील शेतकरी आंदोलनास पाठिंब्याची घोषणा केली आहे.