कॅनडातील ओंटारिओ या मोठ्या प्रांतात ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या पहिल्या मात्रा देण्याचे काम थांबवण्यात आले आहे. या लशीमुळे रक्तात गुठळ्या होत असल्याचे निदर्शनास आल्याने लसीकरण थांबवण्यात आले.

ओंटारिओचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. डेव्हीड विल्यम्स यांनी सांगितले, की अतिशय काळजीपूर्वक पद्धतीने हा निर्णय घेण्यात आला. अ‍ॅस्ट्राझेनेका लस युरोपीय देशातही मर्यादित वापरासाठी ठेवली असून त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचे दुर्मीळ प्रकार होत आहेत.

गेल्या काही दिवसात असे अनेक प्रकार घडले असून अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या दुसऱ्या मात्रा द्यायच्या की नाही व त्याला पर्याय काय यावर विचार केला  जात आहे. कॅनडात २० लाख मात्रा देण्यात आल्या असून त्यात १२ जणांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या घटना झाल्या आहेत. त्याचबरोबर तीन महिलांचा मृत्यू झाला आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन थ्रुडो यांनी सांगितले, की आम्ही लशीच्या पहिल्या मात्रा अलीकडेच घेतल्या आहेत. पहिल्या मात्रेने काहीही दुष्परिणाम दिसून आले नाहीत.  टोरांटो विद्यापीठातील साथरोगतज्ज्ञ डॉ. अँड्र्यू मॉरिस यांनी सांगितले, की कॅनडात आता इतर अनेक लशी आल्या असून त्यांचा वापर करणे शक्य आहे. दुसरा डोस वेगळ्या लशीचा देण्याबाबत ब्रिटनमध्ये चाचण्या चालू आहेत. त्यात यश आले तर अ‍ॅस्ट्राझेनेकाचा पहिला डोस घेतलेले लोक इतर लशीची दुसरी मात्रा घेऊ शकतील.